कोलंबो: श्रीलंकेच्या आशिया चषकातल्या लाजिरवाण्याचा कामगिरीचा सर्वात मोठा फटका कर्णधार अँजलो मॅथ्यूजला बसला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानं मॅथ्यूजची वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांच्या कर्णधारपदावरुन हकालपट्टी केली आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी श्रीलंकेच्या वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी संघांच्या कर्णधारपदी दिनेश चंडिमलची नियुक्ती करण्यात आली आहे. चंडिमल हा आधीपासूनच श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार आहे. आता तिन्ही फॉरमॅट्समध्ये तोच श्रीलंकेचा कर्णधार असेल. श्रीलंका संघ 10 ऑक्टोबरपासून इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. या दौऱ्यात हा संघ पाच वन डे, एक ट्वेन्टी ट्वेन्टी आणि तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत खेळेल.

दरम्यान, कर्णधारपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर अँजलो मॅथ्यूजने नाराजी व्यक्त केली आहे. त्याने बोर्डाला पत्र लिहून आपला विरोध दर्शवला आहे. संघाच्या खराब कामगिरीनंतर आपल्याला बळीचा बकरा बनवलं जात आहे, असं मॅथ्यूजने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

“शुक्रवारी झालेल्या बैठकीनंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने मला वन डे आणि टी 20 संघाचं कर्णधारपद सोडण्यास सांगितलं. मला खूपच धक्का बसला. मात्र मला बळीचा बकरा बनवलं जात आहे” , असं मॅथ्यूजने नमूद केलं.

आशिया चषकात अफगाणिस्तान आणि बांगलादेशकडून झालेल्या पराभवाची जबाबदारी मी स्वीकारतो. मात्र संपूर्ण टीमच्या कामगिरीला मी एकटाच जबाबदार कसा, असा सवाल मॅथ्यूजने केला. बोर्डाने दिलेल्या कारणांशी मी सहमत नाही. मात्र निवड समिती आणि मुख्य प्रशिक्षकांच्या निर्णयाचा मी आदर करतो, असंही मॅथ्यूजने म्हटलं आहे.

आशिया चषकाच्या पहिल्याच फेरीत श्रीलंकेला दुबळ्या अफगाणिस्तान आणि बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे श्रीलंकेला पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला.