मुंबई : गणपती विसर्जनासाठी काल (23 सप्टेंबर) मुंबईतील लालबाब-परळ परिसरात जमलेल्या गणेशभक्तांवर चोरट्यांनी चांगलाच हात साफ करुन घेतला. शेकडो भक्तांचे मोबाईल, पाकिटं, दागिने लांबवल्याच्या अनेक तक्रारी आज काळाचौकी पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आल्या आहेत.
गेल्या दहा दिवसात जेवढ्या चोऱ्या झाल्या नाहीत तेवढ्या एका दिवसात झाल्याचं तक्रारदारांचे म्हणणं आहे. कालपासून सुमारे 300 ते 400 अशा तक्रारी एकट्या लालबाग परिसरातील असल्याचा अंदाज आहे. मात्र पोलिसांनी यावर अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही.
लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोबाईल चोरी झाल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे. लालबागचा राजा मंडपातून बाहेर आल्यानंतर काही क्षण धक्काबुक्की झाली, त्याचवेळी मोबाईल तसंच पाकिटं चोरीला गेल्याचं तक्रारदारांनी सांगितलं.
लालबागच्या राजाचं विसर्जन
गेले दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर राज्यभरातील गणपती बाप्पांचं काल (23 सप्टेंबर) विसर्जन करण्यात आलं. लालबागच्या राजाची दरवर्षीप्रमाणे यंदाही वाजत-गाजत ढोल-ताशांच्या गजरात, फुलं आणि गुलालाच्या उधळणीत मिरवणूक काढण्यात आली. काल सकाळी साडेदहा-अकराच्या सुमारास मंडपातून बाहेर पडलेला लालबागचा राजा आज सकाळी गिरगाव चौपाटीवर पोहोचला. त्यानंतर सकाळी नऊ वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.