मुंबई : 2019 च्या क्रिकेट विश्वचषकासाठी थेट पात्र ठरणारा श्रीलंका हा आठवा आणि अंतिम संघ ठरला आहे. इंग्लंडने वेस्ट इंडिजचा सात विकेट्सनी धुव्वा उडवल्यामुळे आपोआप श्रीलंका वर्ल्डकपसाठी पात्र ठरला आहे.


30 सप्टेंबर ही अंतिम तारीख असल्यामुळे आयसीसीच्या वनडे रँकिंगमध्ये 78 गुणांवर असलेला वेस्ट इंडिज संघ श्रीलंकेच्या (86 गुण) पुढे जाण्याची शक्यता नाही. त्यामुळे श्रीलंकेने विश्वचषकामध्ये आपलं स्थान कायम केलं आहे.

श्रीलंकेवर मात करण्यासाठी विंडीजला इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका 4-0 किंवा 5-0 ने खिशात घालण्याची आवश्यकता होती. मात्र ओल्ड ट्रॅफॉर्डमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या वन डे सामन्यात इंग्लंडने विंडीजवर सात गडी राखून मात केली.  त्यामुळे आपोआपच विंडीज या शर्यतीतून बाहेर पडलं. श्रीलंकेने 1996 मध्ये विश्वचषकावर नाव कोरलं होतं.

विश्वचषक खेळणारे आठ देश कोणते?

ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका

30 मे ते 15 जुलै 2019 या कालावधीत इंग्लंडमध्ये विश्वचषक खेळवला जाणार आहे.

विंडीजकडे पर्याय काय?

वेस्ट इंडिजने 1975 आणि 1979 मध्ये वर्ल्डकप काबीज केला होता. विंडीजकडे अजुनही 2019 मध्ये विश्वचषक खेळणाऱ्या दहा संघांत सहभागी होण्याची संधी आहे. त्यासाठी वेस्ट इंडिजला 2018 मध्ये 10 संघांच्या क्वॉलिफायर फेरीत सहभागी व्हावं लागेल.

त्यांच्यासोबत आयसीसी क्रमवारीतील तळाचे तीन संघ म्हणजेच अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि आयर्लंड असतील. त्याचप्रमाणे आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग चॅम्पियनशिपमधील टॉप चार और आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीग डिवीजन 2 च्या टॉप दोन टीम्सशीही त्यांची गाठ पडेल.