मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली
एबीपी माझा वेब टीम | 20 Sep 2017 08:29 AM (IST)
मालाड सबवेमध्येही पाणी भरल्यामुळे मंगळवारी रात्री बेस्ट बस पाण्यात अडकली होती. सबवे वर पाणी साचल्यामुळे ही बस थांबवण्यात आली होती. त्यानंतर पावसाचे पाणी वाढत गेल्याने बस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली.
मुंबई : मुंबईसह ठाणे-कल्याण आणि वसई-विरार परिसरांना मंगळवारपासून मुसळधार पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे लोकलसह रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबईत मंगळवारी दुपारपासून सुरु झालेल्या पावसानं रात्री उसंत घेतली होती. मात्र पहाटेपासूनच पावसाने पुन्हा जोर धरला आहे. मुंबईतल्या पावसामुळे हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं आहे. त्याचप्रमाणे वांद्रे, अंधेरी भागातही पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मालाड सबवेमध्येही पाणी भरल्यामुळे मंगळवारी रात्री बेस्ट बस पाण्यात अडकली होती. सबवे वर पाणी साचल्यामुळे ही बस थांबवण्यात आली होती. त्यानंतर पावसाचे पाणी वाढत गेल्याने बस अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाली. वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे आणि इस्टर्न फ्री वे वरील वाहतूक सुरळीत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्विटरवर दिली आहे. त्याचप्रमाणे हाजी अली जंक्शन, पेडर रोड, वांद्रे-वरळी सी लिंकवरही वाहतूक सुरळीत आहे. वांद्रे लिकिंग रोड, एसव्ही रोड, जेव्हीएलआर (जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड)वर काही ठिकाणी पाणी साचल्याची माहिती आहे. अंधेरी सबवे, दहिसर सबवे आणि खार सबवेत पाणी साचल्यामुळे वाहतुकीसाठी रस्ते बंद करण्यात आले आहेत. अंधेरी स्टेशनजवळही पाणी साचलं आहे. मिलन सबवेत पाणी साचल्यामुळे पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. https://twitter.com/MumbaiPolice/status/910342876453842951 https://twitter.com/MumbaiPolice/status/910332296305053696 https://twitter.com/MumbaiPolice/status/910333009299046400 https://twitter.com/MumbaiPolice/status/910332938281132032 जोरदार पावसामुळे मुंबई मेट्रोपोलिटन क्षेत्र म्हणजेच मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार मधील सर्व शाळा- महाविद्यालयं बंद राहणार आहेत. मुंबईतील पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज (20 सप्टेंबर) मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत.