कोकण विभाग
मुंबईसह पावसानं कोकणालाही झोडपलं आहे. येत्या 24 तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. परिसरात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
कुडाळ तालुक्यातील माणगाव-आंबेरी पुलावर मंगळवारी सकाळपासून पावसाचं पाणी आलं होतं. त्यामुळे माणगाव खोर्यातील 27 गावांचा संपर्क तुटला होता. तर तिकडं रत्नागिरी आणि रायगडला जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे सध्या जनजीवन विस्कळीत झालं आहे.
पुणे आणि प. महाराष्ट्र
पुण्यात काल रात्रभर सुरु असणाऱ्या पावसानं सध्या उसंत घेतली आहे. तर तिकडे पश्चिम महाराष्ट्रातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. काल सलग बरसणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधील राधानगरी धरणाचे सात दरवाजे उघडण्यात आले होते. ज्यामधून १२ हजार क्सुसेस वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू होता.
तर तिकडे सातारा जिल्ह्यातही पाऊस सुरु आहे. महाबळेश्वर, पाचगणी, कोयना परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे कोयना धरणात झपाट्यानं पाण्याची पातळी वाढत झाली.
मराठावाडा
दरम्यान, मराठावाड्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे. आजही अनेक ठिकाणी सध्या ढगाळ वातावरण असून पाऊस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तर महाराष्ट्र
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही पावसाची संततधार सुरुच आहे. गंगापूर धरणक्षेत्रात जोरदार पाऊस बरसत आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून 4 हजार क्यूसेस वेगानं विसर्ग सुरु आहे.
विदर्भ
एकीकडे मुंबई आणि कोकणात मुसळधार पाऊस बरसत असताना विदर्भातील काही भागात संततधार पाऊस सुरु आहे. तर अकोला, चंद्रपूर, बुलडाणा, गडचिरोली इथं सध्या पाऊस नसला तरी ढगाळ वातावरण आहे. तर गोंदिया आणि भंडाऱ्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला आहे. तर भंडारा, वर्धा या भागाला अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे.
संबंधित बातम्या :
मुंबईतील तुफान पावसाचा हवाई सेवेलाही फटका, अनेक उड्डाणं रद्द
मुंबईला पावसाने झोडपलं, कुठे पाणी साचलं, कुठे बस अडकली
चर्चगेटहून रात्री 10.56 ला सुटलेली लोकल पहाटे 5 वाजता विरारला
सुरक्षेचा उपाय म्हणून मुंबईतील सर्व शाळा, कॉलेज आज बंद राहणार