जवळपास 50 प्रेक्षकांनी बसच्या पार्किंमध्ये जाऊन खेळाडूंविरोधात घोषणाबाजी केली आणि गोंधळ घातला. त्यानंतर पोलिसांनी सर्व प्रेक्षकांना हटवलं, असं वृत्त 'ईएसपीएनक्रिकइन्फो'ने दिलं आहे.
या घटनेमुळे श्रीलंकेच्या संघाला रवाना होण्यासाठी अर्धा तास उशीर झाला. श्रीलंकेला या पराभवानंतर सोशल मीडियावरील टीकेचाही सामना करावा लागला. यामध्ये सर्वाधिक निवडकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
टीम इंडियाने दम्बुलाच्या पहिल्या वन डेत श्रीलंकेचा नऊ विकेट्सनी धुव्वा उडवून, पाच सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात भारताच्या फिरकी गोलंदाजांनी श्रीलंकेचा डाव अवघ्या 216 धावांत गुंडाळून निम्मी कामगिरी फत्ते केली होती. मग शिखर धवन आणि विराट कोहलीनं दुसऱ्या विकेटसाठी 197 धावांची अभेद्य भागीदारी रचून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
शिखर धवनने 90 चेंडूंत 20 चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद 132 धावांची खेळी उभारली. विराट कोहलीनं 70 चेंडूंत 10 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 82 धावांची खेळी केली.