मुंबई : मुंबईसह राज्यभरातील सिनेमा थिएटरमध्ये फक्त तिथल्या अन्नपदार्थांची सक्ती नको, घरगुती अन्नपदार्थ आणि पाणीदेखील नेऊ देण्यात यावेत, अशी जनहित याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. जैनेंद्र बक्षी यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे.


ज्येष्ठ नागरिक आणि ज्यांना तब्येतीच्या दृष्टीनं काही पथ्यं आहेत त्यांनाही नाईलाजानं फास्ट फूड खावं लागत असल्याची या याचिकेत तक्रार करण्यात आली आहे. सक्तीच्या फास्ट फूड खरेदीमुळे घटनेच्या कलम 21 नुसार जगण्याच्या अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. थिएटरमध्ये घरगुती अन्नपदार्थ नेण्यास मनाई करण्यासाठी कायद्याचा कोणताही आधार नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

सिनेमा हॉलमध्ये अन्नपदार्थ विक्रीला मनाई करण्यात यावी, अशीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरातील सिनेमा थिएटर्समध्ये हीच परिस्थिती असल्याचं मत मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होणं अपेक्षित आहे.