सेंट लूसिया : श्रीलंका क्रिकेट संघाचा कर्णधार दिनेश चंडिमलला आयसीसीने बॉल टॅम्परिंग प्रकरणात दोषी ठरवलं आहे. वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी चंडिमलने चेंडू कुरतडल्याचे चौकशीत निष्पन्न झालं आहे. आयसीसीने रविवारी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर याबाबतची माहिती दिली आहे.

आयसीसीने ट्वीटमध्ये म्हटलं की, 'श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलने आयसीसीची आचारसंहिता 2.2.9चे उल्लंघन केलं आहे.' याशिवाय याप्रकरणाची अधिक माहिती लवकरच उपलब्ध केली जाईल असंही आयसीसीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

श्रीलंकेच्या खेळाडूंनी चुकीच्या पद्धतीने चेंडू चमकवल्याचा आरोप पंचांनी केला होता. त्यांनंतर श्रीलंकेला पाच धावांची पेनल्टी आणि चेंडू बदलण्याच निर्णय पंचानी घेतला होता. पंचांच्या आरोपाचा निषेध करत श्रीलंकेच्या खेळाडूंनी तिसऱ्या दिवशी खेळण्यास मनाई केली. मात्र मॅच रेफरी, श्रीलंका संघाचे व्यवस्थापक आणि श्रीलंका संघाचे प्रशिक्षक यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका संघ मैदानात उतरला.

बॉल टॅम्परिंगप्रकरणी स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर एक वर्षाची बंदी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावरही मार्चमध्ये बॉल टॅम्परिंग प्रकरणी आयसीसीने कारवाई केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मार्च महिन्यात झालेल्या सामन्यात या तिघांना दोषी ठरवण्यात आलं होतं. स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर एका वर्षाची बंदी, तर चेंडू कुरतडणारा कॅमेरून बॅनक्रॉफ्टकर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय स्मिथ व वॉर्नर यांना दोन वर्षे संघाचे कर्णधारपदही मिळणार नाही.