पल्लीकल : कॅण्डी : टीम इंडियानं कॅण्डीच्या तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पहिला डाव अवघ्या 135 धावांत गुंडाळून, यजमानांवर फॉलोऑन लादला आहे. या कसोटीत भारताच्या हाताशी तब्बल 352 धावांची आघाडी आहे. त्यामुळं या कसोटीवर टीम इंडियानं दुसऱ्याच दिवशी आपली पकड घट्ट केली आहे.

भारताकडून कुलदीप यादवनं 40 धावांत चार फलंदाजांना माघारी धाडलं. मोहम्मद शमी आणि रवीचंद्रन अश्विननं प्रत्येकी दोन विकेट्स घेऊन, त्याला छान साथ दिली. त्याआधी या कसोटीत हार्दिक पंड्याच्या पहिल्या कसोटी शतकाच्या जोरावर भारतानं पहिल्या डावात सर्व बाद 487 धावांची मजल मारली. हार्दिक पंड्याने 96 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 108 धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताच्या शिखर धवन आणि लोकेश राहुल या दोन्ही सलामीवीरांनी भारताच्या डावाची दमदार सुरुवात केली. शिखर धवननं कारकीर्दीतील सहावं कसोटी शतक झळकावलं. त्यानं 123 चेंडूत 17 चौकारांसह 119 धावांची खेळी उभारली.

लोकेश राहुलनंही 135 चेंडूत 8 चौकारांसह 85 धावा केल्या. राहुलचं हे सलग सातवं अर्धशतक होतं. या दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी 188 धावांची भागीदारीही साकारली.

धवन आणि राहुल बाद झाल्यानंतर श्रीलंकेच्या फिरकीसमोर भारताचा डाव गडगडला. चेतेश्वर पुजारा 8 धावा काढून बाद झाला. त्यानंतर आलेल्या अजिंक्य रहाणेनं 13 तर आर अश्विननं 31 धावांचं योगदान दिलं. कर्णधार विराट कोहलीनंही 42 धावा करत संघाचा डाव सावरण्याचा थोडाफार प्रयत्न केला.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी रिद्धीमान साहा 13 तर हार्दिक पंड्या 1 धावांवर खेळत होता. पंड्याने दुसऱ्या दिवशी जबरदस्त खेळी करत भारताला 487 धावांची मजल मारुन दिली.

5 चेंडूत 26 धावा, वादळी शतक ठोकत पंड्याकडून मोठा विक्रम मोडित

एका षटकात 26 धावा ठोकून पंड्याने नव्या विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एका षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता.

पंड्याने पुष्पकुमाराच्या षटकात पहिल्या दोन चेंडूवर सलग दौन चौकार आणि नंतर सलग तीन षटकार ठोकले. अशा एकूण 26 धावा त्याने केवळ 5 चेंडूत पूर्ण केल्या.

संबंधित बातम्या :

5 चेंडूत 26 धावा, पंड्याचं कसोटीत वादळी शतक


शतकी खेळीसोबतच हार्दिक पंड्याचे 6 विक्रम