SRH vs DC, IPL 2021 1st Innings Highlights: आयपीएलच्या चेन्नईत सुरु असलेल्या सामन्यात दिल्लीनं हैदराबादसमोर 160 धावांचं आव्हान ठेवलं आहे. सलामीवीर पृथ्वी शॉचं शानदार अर्धशतक तसेच ऋषभ पंत, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथच्या चांगल्या खेळीच्या बळावर दिल्लीनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 बाद 159 धावा केल्या.


दिल्लीकडून प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी चांगली सुरुवात करुन दिली. पावरप्लेच्या 6 षटकात या दोघांनी 51 धावा केल्या.   धवन-शॉने पहिल्या गड्यासाठी 81 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन 28 धावांवर बाद झाला. शिखरनंतर पृथ्वी शॉ देखील धावबाद झाला. त्याने 7 चौकार आणि एका षटकारासह 53 धावा केल्या. 


त्यानंतर कर्णधार ऋषभ पंत आणि स्टीव्ह स्मिथ यांनी संयमी खेळी केली. 19 व्या षटकात सिद्धार्थ कौलने पंतला बाद केले. पंतने 4 चौकार आणि एका षटकारासह 37 धावा केल्या. पंतनंतर आलेल्या हेटमायरला एकच धाव करता आली. स्टिव्ह स्मिथनं 25 चेंडूत 34 धावा काढल्या. त्यानं आपल्या खेळीत 3 चौकार आणि एक षटकार खेचला. दिल्लीला चांगली सुरुवात होऊनही 20 षटकात 159 धावांवर समाधान मानावे लागले. 


हैदराबादकडून सिद्धार्थ कौलनं 2 तर राशिद खाननं एक विकेट घेतली. आज दिल्लीच्या अंतिम संघात अक्षर पटेलची एन्ट्री झाली आहे. ललित यादवच्या जागी तो आज संघात परतला आहे. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारऐवजी जगदीश सुचितला स्थान दिले आहे.