मुंबई : लॉस एंजलिसमध्ये घुमणारे एंड ऑस्कर गोज टू.. हे शब्द कानात साठवण्यासाठी अस्सल हॉलिवूडप्रेमी आसूसलेला असतो. तो दिमाखदार सोहळा देखणा असतोच. पण त्याआधी असणारं रेड कारपेटही पाहण्यासारखं असतं. त्या रेड कारपेटवर जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सिनेरसिकांना वेड लावणारे कलाकार अवतरतात. त्यांची फॅशन आणि त्यांची एक छबी टिपण्यासाठी कॅमेरे सरसावतात आणि त्यानंतर सुरू होतो ऑस्कर्सचा सोहळा. दरवर्षीचं हे चित्र आहे. पण यंदा मात्र त्या नेहमीच्या सोहळ्याला थोडी कात्री लागणार आहे. कोरोनाचा कहर जगभरात आहे. त्याची दखल घेऊन अनेक गोष्टी यंदा या सोहळ्यात बदलण्यात आल्या आहेत. सोमवारी म्हणजे, 26 एप्रिलला पहाटे साडेपाच ते साडेआठ या वेळेत हा सोहळा भारतीयांना पाहता येणार आहे. 

Continues below advertisement


दरवर्षी हा सोहळा पुरस्कार आणि कार्यक्रम असा होतो. यात हॉलिवूडचे अतिरथी महारथी गायन सादर करतात. काही परफॉर्मन्स असतात. पण यंदा मात्र हा सोहळा दोन ठिकाणी होणार आहे. पैकी ऑस्कर प्रदान सोहळा होईल तो लॉस एंजलिसच्या डॉल्बी थिएटरमध्ये तर ऑस्कर्समध्ये होणाऱ्या कलांचं सादरीकरण होणार आहे ते त्याच शहरात मात्र दुसऱ्या ठिकाणी. त्या ठिकाणाचं नाव आहे लॉस एंजलिस युनियन स्टेशन. खरंतर ऑस्करचा हा सोहळा फेब्रुवारी महिन्यात होतो. पण कोव्हिडच्या लाटेमुळे या सोहळ्याला दोन महिने उशीर झाला आहे. दरवेळी या कार्यक्रमाला ज्युरी मेंबर्स असतात. कलाकार असतात. तीन मजल्यांवर हे पाहुणे असतात. यंदा मात्र या सोहळ्याला कुणालाही बोलावणं धाडण्यात आलेलं नाही. 


अमेरिकेतल्या प्रमाणवेळेनुसार हा सोहळा तिकडे रविवारी सायंकाळपासून सुरू होईल. पण भारतात तो दिसेल सोमवारी पहाटे साडेपाच वाजल्यापासून. डिस्ने-हॉटस्टार या ओटीटीवर आपल्याला तो पाहता येणार आहे. यंदाच्या ऑस्करमध्ये सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे ते मॅंक या चित्रपटावर. या चित्रपटाला यंदा १० नामांकनं मिळालेली आहेत. याशिवाय, द फादर, ज्युडस एंड द ब्लॅक मसाया, मिनारी, द ट्रायल ऑफ द शिकागो ७, नोमॅडलॅंड, प्रॉमिसिंग यंग वूमन, ब्लॅक बॉटम, साऊंड ऑफ मेटल या चित्रपटांचाही यात समावेश होतो.