पिंपरी चिंचवड : ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत राज्य सरकारने लावलेल्या लॉकडाऊनचे नियम स्वतः नेतेच पायदळी तुडवत आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना रुग्णालयांना भेटी देण्याचं आणि कोविड केअर सेंटरचे उद्घाटन करण्याचं नियोजन आज भाजपने आखले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित हे सर्व पार पडलं.
राज्य सरकारने लग्न समारंभाची उपस्थिती 25 व्यक्तींवर, अंत्यविधीची 20 व्यक्तींवर तर अन्य राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना आवर घालण्याचा नियम काढलाय. पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी नगरिकांना हेच नियम अंमलात आणण्याचं आवाहन करतायेत. पण पिंपरी चिंचवडमध्ये याच भाजपच्या नेत्यांनी हे नियम पायदळी तुडवले.
कोरोनाच्या कठीण काळात आम्ही शहरवासीयांसाठी कसे झटतोय हे दाखविण्याच्या हव्यासातून लॉकडाऊनच्या नियमांना भाजपने हरताळ फासले. कोविड रुग्णालय, रुग्ण वाहिका अनावरण सोहळा ऑनलाईन पार पाडता आला असता पण प्रत्यक्षात उपस्थिती लाऊन काही ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडवला. यावेळी फोटोसाठी चढाओढ देखील पहायला मिळाली.
विशेष म्हणजे जनतेला 'घरीच रहा, सुरक्षित रहा' असं आवाहन करणारे सर्व नेते यात सामील झाले होते. या कार्यक्रमांसाठी पोलिसांची परवानगी घेतली होती का? असा प्रश्न भाजपचे सभागृह नेते नामदेव ढाके यांना विचारला असता, अशा कार्यक्रमांना पोलीस परवानगीची गरज नसते असं ते म्हणाले. पुढचा प्रश्न हा राज्य सरकारने राजकीय-सामाजिक कार्यक्रम कटाक्षाने टाळायला सांगितले आहेत असं विचारलं असता ते निरुत्तर राहिले.
त्यामुळे ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत लागू केलेले लॉकडाऊनचे नियम केवळ सर्वसामान्यांसाठी आहेत आणि राजकीय नेत्यांना यातून मुभा दिलेली आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जातोय. त्यामुळं कोरोना नियमांचं उल्लंघन केल्यानंतर सामान्यांवर जशी कारवाई केली जाते, तशीच कारवाई भाजप नेत्यांवर करण्याचं धाडस प्रशासन दाखवणार का? हे पाहणं महत्वाचं राहील.
पिंपरी चिंचवडमधील कोरोनाची सद्यस्थिती
कोरोना रुग्ण - 2,00,667
कोरोना रुग्णांचा मृत्यू - 2669
कोरोना मुक्त - 1,72,679
लसीकरण - 3,61,083