नवी दिल्ली: भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस श्रीसंत स्थानीय क्रिकेटमध्ये तब्बल सात वर्षांनंतर परतणार आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीसाठी केरळच्या संघात त्याची निवड झाली आहे. मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीसंतवर सात वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आयपीएलमध्ये स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बीसीसीआयनं श्रीसंतवर बंदी घातली होती. आता स्टेट क्रिकेट बोर्डकडून घोषित केरळ टीममध्ये श्रीसंतचा समावेश केला आहे. ही टी-20 मालिका 10 जानेवारीपासून मुंबईत खेळली जाणार आहे.
केरळ क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की सय्यद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंटमध्ये केरळच्या संघाचं नेतृत्व संजू सॅमसन करेल. या संघात सचिन बेबी, श्रीसंत, बासिल थम्पी, जलज सक्सेना, रॉबिन उथप्पा, विष्णु विनोद, सलमान निझार, निधेश एमडी आणि आसिफ यांचा देखील समावेश आहे. अक्षय चंद्रन, अभिषेक मोहन एसएल, वीनोप एस मनोहरन, मोहम्मद अजहरुद्दीन एम, रोहन एस कुन्नुमल आणि मिधुन एस देखील संघात असतील.
श्रीसंत जवळपास 7 वर्षांपासून खेळापासून दूर आहे. पण, आता त्याच्यावर असणारे हे निर्बंध उठवण्यात आल्यामुळं तब्बल सात वर्षांहून अधिक काळानंतर आता तो स्थानिक क्रिकेटमधून या क्षेत्रात पुनरागमन करण्यास तयार झाला आहे.
श्रीसंतवर ऑगस्ट 2013ला IPL सामन्यादरम्यान स्प़ॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा म्हणून BCCI कडून निर्बंध लावण्यात आले होते. ज्याअंतर्गत त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं मात्र त्याला आरोपमुक्त करत दिलासा दिला.
श्रीसंतनं आतापर्यंत भारतासाठी 27 कसोटी सामने, 52 एकदिवसीय सामने आणि 10 टी20 सामन्यांत योगदान दिलं आहे.