मोहाली: दिनांक २ नोव्हेंबर २०१३- रोहित शर्माचं वन डे कारकीर्दीतलं पहिलं द्विशतक साजरं...मैदान होतं बंगळुरूचं चिन्नास्वामी स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी होता ऑस्ट्रेलिया


दिनांक १३ नोव्हेंबर २०१४ - रोहित शर्मानं झळकावलं वन डे कारकीर्दीतलं दुसरं द्विशतक... मैदान होतं कोलकात्याचं ईडन गार्डन्स आणि प्रतिस्पर्धी होता श्रीलंका.

आणि दिनांक १३ डिसेंबर २०१७ - मैदान होतं मोहालीचं पीसीए स्टेडियम आणि प्रतिस्पर्धी होता पुन्हा श्रीलंका

रोहित शर्मानं ठोकलं वन डे कारकीर्दीतलं तिसरं द्विशतक...

वन डे क्रिकेटच्या मैदानात खरं तर एका रथीमहारथीला एक द्विशतक ठोकणंही मुश्किल असतं. सचिन तेंडुलकर नावाच्या मास्टर ब्लास्टरनं पहिल्यांदा हा मैलाचा दगड ओलांडला, त्या वेळी वन डे क्रिकेटचा इतिहास तब्बल ३९ वर्षे जुना झाला होता. त्यानंतर वीरेंद्र सहवाग, मार्टिन गप्टिल आणि ख्रिस गेलनं वन डेत प्रत्येकी एकदा द्विशतकाचा टप्पा ओलांडला. पण रोहित शर्मानं गेल्या चार वर्षांत वन डेत तिसऱ्यांदा द्विशतक झळकावण्याची कमाल केली.

रोहित शर्माला त्याच्या दुसऱ्या द्विशतकानं २६४ धावांचा वन डेतला वैयक्तिक उच्चांक गाठून दिला असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात त्याच्यासाठी तिसरं द्विशतक लाखमोलाचं ठरावं. कारण रोहितनं हे द्विशतक नेमकं त्याच्या लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवशी साजरं केलं. आणि विशेष रोहितची पत्नी रितिका सजदे त्या वेळी मोहालीच्या स्टेडियममध्ये उपस्थित होती.

रोहित शर्मा आणि त्याच्या टीम इंडियाला धरमशालाच्या मैदानात धावांचा उपवास घडला होता. तिथल्या पहिल्या वन डेत भारतीय कर्णधाराला लाजिरवाण्या पराभवाची नामुष्की सहन करावी लागली होती. त्या पराभवानं पेटून उठलेला रोहित मोहालीच्या रणांगणात श्रीलंकेच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला. त्याच्या १५३ चेंडूंमधल्या नाबाद २०८ धावांच्या खेळीला १३ चौकार आणि १२ षटकारांचा साज होता. रोहितच्या लाडक्या रितिकासाठी तो साज आणि ते द्विशतक आजवरचं सर्वात अनमोल गिफ्ट ठरावं.

वन डेतला पहिला द्विशतकवीर सचिन तेंडुलकरनं रोहितला शाबासकी देताना ट्विटरवर म्हटलंय की, मित्रा तुला अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. तुझी फलंदाजी पाहण्याचा आनंद काही वेगळाच आहे. रोहितनं हा आनंद पुन्हा पुन: लुटू द्यावा हीच सचिनसह त्याच्या चाहत्यांची इच्छा असावी.