मुंबई : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द वाढवण्यासाठी स्टेनने कसोटीतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.
मी क्रिकेटमधील माझ्या आवडत्या फॉरमॅटमधून निवृत्त होत आहे, पण यानंतर वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटवर पूर्ण लक्ष केंद्रित करणार असल्याचं निवृत्तीवेळी स्टेनने सांगितलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक असलेल्या स्टेनने 2004 साली इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. तर यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्याने श्रीलंकेविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
36 वर्षीय डेल स्टेनने दक्षिण आफ्रिकेकडून 93 कसोटी सामन्यात 22.95 च्या सरासरीने 439 विकेट घेतल्या आहेत. डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये 26 वेळा एकाच डावात पाचहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. 2004 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन डेलच्या निवृत्तीच्या निर्णयाला दुजोरा दिला. "डेल स्टनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे", असं ट्वीट दक्षिण आफ्रिका क्रिकेट मंडळाने केलं आहे.
डेल स्टेनला गेल्या अनेक दिवसांपासून दुखापतीचा सामना करावा लागत होता. दुखापतीमुळे तो यावर्षीचा विश्वचषकही खेळू शकला नव्हता. त्यामुळे कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन डेल स्टेनला वन डे आणि ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचं आहे.