जोहान्सबर्ग: बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटीत, आफ्रिकेने मोठा विजय मिळवला.
आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर तब्बल 492 धावांनी मात केली.
स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमरुन बॅनक्रॉफ्ट यांची हकालपट्टी, तर मिचेल स्टार्कची दुखापत यामुळे ऑस्ट्रेलियन टीम आधीच बॅकफूटवर गेली होती.
त्याउलट जोश आणि उत्साहाने भरलेली आफ्रिकन टीम तुफान फॉर्ममध्ये होती. आफ्रिकन खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी करत, जोहान्सबर्ग कसोटीत एकहाती विजय मिळवला.
या कसोटीसह आफ्रिकेने चार सामन्यांची मालिका 3-1 अशी जिंकली. 1970 नंतर आफ्रिकेने स्वदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध मिळवलेला हा पहिला मालिका विजय आहे.
दरम्यान, ही कसोटी आफ्रिकेचा मध्यमगती गोलंदाज मॉर्ने मॉर्कलची शेवटची कसोटी होती. याशिवाय बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक डॅरेन लेमननेही राजीनामा दिल्याने, त्याचासाठीही हा शेवटचा सामना होता.
या कसोटीत आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना, पहिल्या डावात सर्वबाद 488 धावा केल्या होत्या. मग आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 221 धावांत गुंडाळत 267 धावांची भक्कम आघाडी घेतली.
त्यानंतर आफ्रिकेने दुसऱ्या डावात 6 बाद 344 धावा करत, डाव घोषित केला होता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 611 धावांची गरज होती. मात्र त्यांना 119 धावांपर्यंतच मजल मारता आली.
आफ्रिकेच्या फिलेंडरने तुफानी गोलंदाजी करत 6 विकेट्स घेतल्या.