पोर्ट एलिझाबेथमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन बाद झाल्यानंतर रबाडाने जो अतिउत्साह दाखवला आणि सेलिब्रेशन केलं, त्यामुळे आयसीसीने कारवाई केली आहे. सामन्याच्या मानधनाच्या 15 टक्के रकमेचा दंड त्याला ठोठावण्यात आला आहे. शिवाय एक डिमेरिट पॉईंटही देण्यात आला आहे.
भारतीय खेळीच्या आठव्या षटकात हा प्रकार घडला. त्याच्या चेंडूवर शिखर धवन बाद होऊन माघारी परतत असताना त्याने धवनकडे पाहून असा इशारा केला, ज्यावर शिखर धवन उत्तर देऊ शकत होता. त्यामुळेच आयसीसीने या प्रकाराची गंभीर दखल घेत कारवाई केली आहे.
रबाडाच्या खात्यात एक डिमेरिट पॉईंट जमा करण्यात आला आहे. कारण, त्याने खेळाडू आणि सहकारी अधिकाऱ्यांच्या आयसीसी आचारसंहिता कलम एकचा भंग केला आहे, त्यामध्ये तो दोषी आढळला, असं आयसीसीने म्हटलं आहे.
मैदानातील पंच इयान गोल्ड, शॉन जॉर्ज, तिसरे पंच अलीम डार आणि चौथे पंच बोंगानी जेले यांनी रबाडावर कलम 2.1.7 नुसार आरोप केला आहे. रबाडानेही हा आरोप स्वीकारला आहे. त्यामुळे कोणतीही अधिकृत सुनावणी घेण्याची गरज पडली नाही.
रबाडाच्या खात्यात आता पाच डिमेरिट पॉईंट जमा झाले आहेत. श्रीलंकेविरुद्ध 8 फेब्रुवारी 2017 रोजी तीन, तर इंग्लंडविरुद्ध 7 जुलै 2017 रोजी लॉर्ड्स कसोटीत एक डिमेरिट पॉईंट त्याच्या खात्यात जमा करण्यात आला होता.
रबाडाच्या खात्यात 24 महिन्यांच्या आत 8 किंवा त्यापेक्षा अधिक डिमेरिट पॉईंट जमा झाल्यास त्याच्यावर दोन कसोटी सामने, किंवा एक कसोटी आणि दोन वन डे/टी-20, यापैकी जे अगोदर खेळवण्यात येईल, त्यासाठी रबाडाचं निलंबन करण्यात येईल.
संबंधित बातम्या :