नवी दिल्ली : देशाच्या सीमा सुरक्षित करण्यासाठी काय करायला हवं असं विचारल्यावर तुम्ही काय उत्तर द्याल? शस्त्रास्त्र खरेदी, कणखर राजनैतिक धोरण, निगराणीच्या अत्याधुनिक सुविधा असंच कुठलाही शहाणा माणूस सांगेल. पण सीमा सुरक्षित व्हाव्यात यासाठी राजधानी दिल्लीत भाजप खासदारांकडून एका महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे.

18 मार्च ते 25 मार्च असा आठवडाभर हा यज्ञ लाल किल्ला परिसरात होणार आहे. पण आज या महायज्ञाच्या तयारीची सुरुवात जल-मिट्टी रथयात्रेनं झाली. देशाच्या टॉप 4 मंत्र्यांपैकी एक असलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीच या रथयात्रेला हिरवा झेंडा दाखवला आहे.

देशाच्या सीमेवर डोकलाम आणि इतर ठिकाणची माती, चार धामांमधलं तीर्थ या यात्रेतून गोळा करुन ते यज्ञासाठी आणलं जाणार आहे. देशाच्या विविध राज्यांमध्ये ही यात्रा फिरुन लोकांना यज्ञासाठी 1 तूप चमचा देण्याचंही आवाहन करणार आहे. मुळात अशा पद्धतीनं लोकांमध्ये पोहचून त्यांच्याकडून राष्ट्रनिर्मितीचे 8 संकल्पही वदवून घेतले जाणार आहेत.

त्यामुळे आता महायज्ञाच्या माध्यमातून भाजपनं 2019 ची सुरुवात केली आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.

कसा असणार आहे महायज्ञ

108 यज्ञकुंड, 1111 ब्राम्हण हे सलग 2.25 कोटी मंत्रांचं उच्चारण या महायज्ञात करणार आहेत. राष्ट्र रक्षा महायज्ञ असं गोंडस नाव या उपक्रमाला दिलं गेलं आहे. एकाचवेळी इतक्या महान यज्ञाचं आयोजन देशात होत असल्याचं सांगत भाजप नेते छाती ठोकताना दिसत आहे.

पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनाही निमंत्रण 

18 मार्च ते 25 मार्च असा हा महायज्ञ दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात होणार आहे. देशभरातले साधू-संत त्यासाठी बोलावले गेले आहेतच. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनाही निमंत्रण पाठवलं गेलं आहे. या राष्ट्रीय रक्षा महायज्ञातून शत्रू विनाशिनी, राजशक्ती प्रदान करमारा भगवती बगलामुखीची आराधना केली जाणार असल्याचं भाजप खासदार महेश गिरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. एकविसाव्या शतकात अशा यज्ञाची गरज आहे की शस्त्रास्त्र खरेदीची गरज आहे? या प्रश्नावर त्यांनी ‘या देशात शस्त्र आणि शास्त्र दोन्हींना समान महत्व आहे.’ असं उत्तर देत आपल्या कृतीचं समर्थन केलं. तसंच 2019 च्या तयारीचा यज्ञाशी संबंध नाही, हा योगिनी पीठातर्फे कार्यक्रम होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.