क्रिकेटपटू सळो की पळो, मॅचमध्ये माशांचा खोडा
एबीपी माझा वेब टीम | 05 Feb 2017 10:28 AM (IST)
जोहान्सबर्ग : मॅच हरत आली तर, 'ब्लेम गेम'साठी 'बकरा' शोधला जातो. यावेळी मात्र 'माशां'ना 'मॅच का मुजरिम' ठरवायला श्रीलंका मोकळी झाली आहे. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या वनडे सामन्यात माशांनी खोडा घातला आणि क्रिकेटपटू सैरावैरा पळत सुटले. जोहान्सबर्गमध्ये श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा वन डे सामना खेळवला जात होता. त्याचवेळी माशांचं वावटळ मैदानावर घोंघावत आलं. श्रीलंकेची खेळी सुरु असतानाच माशांनी दोनवेळा मैदानावर हल्लाबोल चढवला. माशांचा हल्ल्यामुळे दोन्ही संघाच्या क्रिकेटपटूंसह अम्पायरनेही मैदानावर लोटांगण घातलं. अखेर 27 व्या ओव्हरनंतर सामना अधिकृतरित्या थांबवण्यात आला. श्रीलंका त्यावेळी 4 बाद 117 धावांवर खेळत होती. 'बीकीपर' अर्थात माशांना पळवून लावणाऱ्या कामगारांना पाचारण करण्यात आलं त्यापूर्वी अग्निप्रतिबंधक उपकरणाचा वापर करण्यात आला. तासाभरानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने सात गडी राखून जिंकला.