England vs South Africa : विश्वविजेत्या इंग्लंडचा सलग दुसरा दारुण पराभव झाला. दक्षिण आफ्रिकेनं 400 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर इंग्लंडची तारांबळ उडाली. चारशेचा पाठलाग करताना आठव्या षटकांतच इंग्लंडची 5 बाद 67अशी स्थिती झाली. बेन स्टोक्स 5 धावांवर बाद झाला. 4 बाद 38 अशी स्थिती झाल्यानंतर हॅरी ब्रुक आणि बटलरने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, पण बटलर अवघ्या 15 धावांवर बाद झाला.






दहाव्या क्रमांकावर आलेल्या मार्क वूडच्या नाबाद 17 चेंडूतील 43 धावा आणि नवव्या क्रमांकावर आलेल्या अॅत्कीनसनच्या 35 धावांच्या खेळीमुळे इंग्लंडची अब्रू काहीशी वाचली. दोघांनी शेवटच्या विकेटसाठी 70 धावा जोडल्या. तत्पूर्वी त्यांची अवस्था 8 बाद 100 झाली होती. 






तत्पूर्वी, दक्षिण आफ्रिकेने (England vs South Africa) आज मुंबईत वानखेडे स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध तब्बल 399 धावांचा डोंगर उभा केला. प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने अक्षरश: इंग्लंडच्या गोलंदाजांची चौफेर धुलाई करताना 399 धावा कुटल्या. चार धावांवर पहिल्या षटकातील दुसऱ्याच चेंडूवर डिकाॅक बाद झाला. दुसऱ्या विकेटसाठी रिझा हेंड्रिक आणि वॅन देर दुसेन यांनी 121 धावांची भागीदारी केली.






हेंड्रिक 85 धावांवर बाद झाला. दुसेन 60 धावा करून बाद झाला. मारक्रमने 44 धावांचे योगदान दिले. मिलर अवघ्या 5 धावांवर परतला. यानंतर पाचव्या क्रमांकावर क्लासेन आणि सातव्या क्रमांकावर मार्को जानसेन यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांची पुरती धुलाई करताना धावांचा पाऊस पडला. या दोघांनी शेवटच्या 10 षटकात तब्बल 143 धावाचा पाऊस पाडत आफ्रिकेला 400 च्या घरात नेऊन ठेवले.






शेवटच्या षटकात टिचून गोलंदाज झाल्याने 400 आकडा पार होऊ शकला नाही, अन्यथा आणखी एक 400 चा आकडा याच वर्ल्डकपमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पार झाला असता.  






इतर महत्वाच्या बातम्या