धर्मशाला : चालू वर्ल्डकपमधील दोन सर्वात बलाढ्य आणि अपराजित टीम असलेल्या भारत आणि न्यूझीलंडचा (India Vs New Zealand) उद्या (22 ऑक्टोबर) धर्मशालामध्ये महामुकाबला होत आहे. दोन्ही संघानी विजयाचा चौकार मारताना सेमीफायनलच्या दिशेने प्रवास सुरु केला आहे. त्यामुळे एक प्रकारे सेमीफायनल दोन्ही संघांमध्ये असेल यात शंका नाही. टीम इंडियाने चारही सामन्यात सांघिक कामगिरी करत विजयश्री खेचून आणली आहे. न्यूझीलंडने सुद्धा तोच कित्ता गिरवला आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात तुल्यबळ लढत होईल यात शंका नाही. 


आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंड कायम डोकेदुखी 


टीम इंडियाने आजवर आयसीसी स्पर्धांमध्ये सर्वच संघांना अस्मान दाखवलं असलं, तरी न्यूझीलंडने कायम रडवण्याचं काम केलं आहे. आजवर उभय संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने आले तेव्हा न्यूझीलंड सरस ठरला आहे. इतकंच काय न्यूझीलंडने 2019 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनला भारताला धक्का देत अंतिम फेरी गाठली होती. त्या सामन्यात धोनी झालेला रन आऊट हा आजही चाहत्यांचे काळीज चिरतो. 






टीम इंडियाचा अवघा तीनदा विजय 


आजवर आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडन भारताविरोधात 10 विजय मिळवले आहेत, तर भारताला केवळ 3 विजय मिळवले आहेत. भारताने आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडचा शेवटचा पराभव 2003 वर्ल्डकपमध्ये केला होता. त्यानंतर न्यूझीलंडने सलग टीम इंडियाला मात दिली आहे.


2003 च्या वर्ल्डकपच्या सामन्यात काय घडलं?


भारताने सौरभ गांगुलीच्या नेतृत्वात 2003 वर्ल्डकपमध्ये सेंच्युरीयन पार्क मैदानावर झालेल्या सामन्यात न्यूझीलंडला 40.4 षटकांत अवघ्या 150 धावांमद्ये गुंडाळले होते. त्या सामन्यात झहीर खानने भेदक गोलंदाजी करताना 4 विकेट घेतल्या होत्या. यानंतर अवघ्या 151 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात सुद्धा दयनीय झाली होती. न्यूझीलंडने भारताची अवस्था पाच षटकांत 3 बाद 21 केली होती. सचिन, सेहवाग आणि गांगुली स्वस्तात बाद झाले होते. त्यानंतर चौथ्या विकेटसाठी सध्या प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविड आणि समालोचकाच्या भूमिकेत असलेल्या मोहम्मद कैफ यांनी नाबाद भागीदारी करत सामना जिंकून दिला होता. मोहम्मद कैफने 68 धावांची खेळी केली होती, तर द्रविडने 53 धावांची खेळी केली होती. या सामन्यात चार विकेट घेणारा झहीर खान सामनावीर ठरला होता. 




हाच इतिहास रिपीट करावा लागेल! 


त्यामुळे उद्याच्या सामन्यात न्यूझीलंडला नमवण्यासाठी रोहित गांगुली आणि जसप्रित बुमराहला झहीर खानचा भेदक मारा आठवावा लागेल. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही त्यांची खेळी नक्की आठवत असेल. त्यामुळे उद्याच्या सामन्यात सांघिक कामगिरी करून विजय मिळवण्याचे ध्येय टीम इंडियाचे असेल.