कोलकाता : प्रिन्स ऑफ कोलकाता म्हणजे सौरव गांगुली शुक्रवारी चक्क त्याच्याच ईडन गार्डन्सवर लिफ्टमध्ये अडकला. त्यावेळी ईडन गार्डन्सच्या सुरक्षारक्षकांनी दाखवलेलं प्रसंगावधान आणि त्यांनी केलेल्या उपाययोजनांमुळे सौरवदादा लिफ्टमधून सुखरुप बाहेर आला.


सुदैवाने या घटनेत गांगुलीला साधं खरचटलंही नाही. बंगाल क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष असलेला सौरव सायंकाळी पाचच्या सुमारास लिफ्टने पहिल्या मजल्यावरच्या त्याच्या केबिनकडे जात होता. तब्बल 29 वर्ष जुनी असलेली ती लिफ्ट नेमकी दोन मजल्यांच्या मधोमध थांबली. त्यामुळे सौरव गांगुली लिफ्टमध्येच अडकून पडला होता.

ईडन गार्डन्सवरच्या सुरक्षारक्षकांच्या ही गोष्ट ध्यानी येताच त्यांनी धावपळ करुन आधी विद्युतप्रवाह बंद केला. मग जुन्या पद्धतीचा जाळीचा दरवाजा ताकद लावून उघडण्यात आला. त्या जागेतून एक लाकडी स्टूल लिफ्टमध्ये अडकलेल्या सौरवदादाला देण्यात आलं. त्याच स्टुलावर चढून मग तो लिफ्टमधून बाहेर आला.

खरं तर 2011 सालच्या विश्वचषकाच्या निमित्तानं ईडन गार्डन्सचं नूतनीकरण करण्यात आलं होतं. पण 1987 साली बसवण्यात आलेली लिफ्ट त्यावेळी बदलण्यात आली नव्हती. आता बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षांनाच आलेला अनुभव लक्षात घेऊन तरी ती लिफ्ट बदलण्यात येईल, अशी आशा भारतीय क्रिकेटरसिक करत आहेत.