बर्मिंगहॅम : एजबॅस्टनमधील इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर, भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने लॉर्ड्सवर होणाऱ्या सामन्यात अंतिम अकरामध्ये बदल न करण्याचा सल्ला कर्णधार विराट कोहलीला दिला आहे. तर मुरली विजय आणि अजिंक्य रहाणे यांनी अधिक निर्धाराने खेळण्याचा सल्ला दिला आहे.
पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या.
इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये सौरव गांगुलीने लिहिलं आहे की, "जर तुम्हाला कसोटी सामना जिंकायचा असेल तर प्रत्येकाला धावा कराव्या लागतील. पाच सामन्यांच्या मालिकेतील हा पहिलाच सामना होता आणि मला वाटतं की, मालिकेत चांगली कामगिरी करुन पुनरागमन करण्याची क्षमता संघात आहे. अजिंक्य रहाणे आणि मुरली विजयला अधिक निर्धाराने खेळायला हवं, कारण याआधीही त्यांनी अशा परिस्थिती धावा केल्या आहेत."
गांगुली पुढे म्हणाला की, "पराभवासाठी कर्णधार जबाबदार आहे, असं मला वाटत नाही. जर तुम्ही कर्णधार असाल तर जसं विजयासाठी तुमचं कौतुक होतं, तसंच पराभवासाठी तुमच्यावर टीकाही होते. फलंदाजांना संघाबाहेर करण्याआधी त्यांना आवश्यक संधी द्यायला हवी, यासाठीही कोहलीवर टीका होते. इंग्लंडच्या परिस्थितीत स्विंगसमोर अपयश येणं हे कारण आता असू शकत नाही. कारण प्रत्येकाला माहित आहे की, त्यांना कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो."
"हे खरं आहे पण अंतिम अकरामध्ये छेडछाड आणि बदल केल्याने खेळाडूंच्या मनात अशीही भीती निर्माण होऊ शकते की, एवढ्या वर्षांनंतरही ते संघ व्यवस्थापनाचा भरवसा मिळवण्यात अपयशी ठरले. खेळाडूंनी सर्व फॉरमॅटमध्ये खेळणं महत्त्वाचं आहे," असंही गांगुली म्हणाला.
पराभवानंतर टीममध्ये बदल करु नको, गांगुलीचा कोहलीला सल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Aug 2018 10:48 AM (IST)
पहिल्या कसोटीत सलामीवीर मुरली विजयने 20 आणि 6 तर मधल्या फळीतील फलंदाज अजिंक्य रहाणेने 15 आणि 2 धावा केल्या. अशा प्रकारे दोघांनी मिळून केवळ 43 धावाच केल्या.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -