नवी दिल्लीः रिओ ऑलिम्पिकची रौप्यविजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू दीड महिन्यांच्या विश्रांतीनंतर आता डेन्मार्क ओपन सुपर सीरीजमधून पुनरागमन करणार आहे. ओडेनमध्ये मंगळवारपासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे.

या स्पर्धेत सिंधूचा सहभाग हा आकर्षणाचा केंद्रबिंदू असेल. सिंधूसमोर बुधवारी आपल्या पहिल्या सामन्यात चीनच्या हे बिंगजिआओचं आव्हान असेल. सिंधूला गेल्या वर्षी डेन्मार्क ओपनमध्ये उपविजेतपदावर समाधान मानावं लागलं होतं.

यंदा सिंधूला या स्पर्धेसाठी सहावं मानांकन देण्यात आलं आहे. ऑलिम्पिकचं रौप्य पदक आणि दोनदा जागतिक स्पर्धेचं कांस्यपदक मिळवणाऱ्या सिंधूला आजवर एकही सुपर सीरीज विजेतेपद मिळवता आलेलं नाही. सिंधू ती उणीव कधी भरून काढते याची तिचे चाहते उत्सुकतेनं वाट पाहत आहेत.