मुंबई : करण जोहरच्या आगामी 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होतानाच दिसत आहे. 'ऐ दिल..' प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईल उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे.


मनसेने पत्र लिहून मल्टिप्लेक्स चालकांना 'ऐ दिल है मुश्किल' हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे. तसं न केल्यास मनसे स्टाईल विरोधाला सामोरं जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे.

पाकिस्तानी कलाकारांची भूमिका असलेले चित्रपट प्रदर्शित करण्यास मनसेने विरोध दर्शवला आहे. 'मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका' असा दमही भरला आहे.

सिंगल स्क्रीनचालकही एकवटले:

पाकिस्तानी कलाकार असलेले सिनेमे दाखवणार नाही, असा निर्णय सिंगल स्क्रीन थिएटर मालकांनी यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे मल्टिप्लेक्स चालक काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

'मामी'तून पाकिस्तानी सिनेमा आऊट:

मनसेने मामी फिल्म फेस्टिव्हलमधील पाकिस्तानी चित्रपटांनाही विरोध केला होता. त्याच वेळी पाक कलाकारांना वाढता विरोध पाहता मामी फिल्म फेस्टिव्हलमधून पाकिस्तानी सिनेमाचं स्क्रानिंग रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. क्लासिक सेक्शनमध्ये 'जागो हुवा सवेरा'ची निवड झाली होती.

ऐ दिल है मुश्किलचा वाद काय आहे?

‘ऐ दिल है मुश्किल’ या करण जोहरच्या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची भूमिका आहे. पाकिस्तानी कलाकारांना आपल्या सिनेमात घेऊ नये, यासाठी मनसेने आवाज उठवला होता. त्यानंतर फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांनी भारत सोडलं. मात्र, करण जोहरच्या सिनेमात फवादची भूमिका असल्याने तो वादात सापडला. आता तर सिंगल स्क्रिन थिएटर असोसिएशन आणि सिनेमा ओनर असोसिएशनने करण जोहरचा सिनेमा थिएटरमध्ये न प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 28 ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या या सिनेमासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत.

संबंधित बातम्या :


मोदीजी, पाकिस्तान दौऱ्याबाबत माफी कधी मागताय? : अनुराग कश्यप


भारत-पाक संबंधांवरुन फिल्मस्टारच टार्गेट का? : प्रियंका