नवी दिल्लीः ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेती पीव्ही सिंधूंची क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये. तिची हीच क्रेझ कॅच करण्यासाठी स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनी बेसलाईनने तिच्यासोबत तब्बल 50 कोटी रुपयांचा करार केला आहे. जाहिरातींसाठी 3 वर्षांसाठी तिला करारबद्ध करण्यात आलं आहे.
बेसलाईन कंपनीचे कार्यकारी संचालक तुहीन मिश्रा यांनी यासंदर्भात माहिती दिली. या करारामुळे आपण आनंदी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान सिंधूंसोबत झालेल्या या करारामुळे जाहिरातींसाठी केवळ क्रिकेटपटूंनाच जास्त पैसे मिळतात, हा समज खोटा ठरवला आहे.
बेसलाईन आता सिंधूच्या ब्रँड प्रोफाईलिंगचं काम पाहणार आहे. सिंधूसोबत सध्या 16 कंपन्या जाहिरातींसाठी करार करण्यासाठी उत्सुक आहेत. त्यापैकी 9 कंपन्यांसोबत सिंधू करारबद्ध होणार आहे. कोणत्या कंपन्यांसोबत करार करायचा हे येत्या आठवडाभरात निश्चित होईल, अशी माहिती मिश्रा यांनी दिली.