नाशिकः एकीकडे कांद्याचे भाव उतरल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांची कोबी आणि टोमॅटोही मातीमोल भावाने विकला जात आहे. येवल्यातल्या बाजारात टोमॅटो अवघा अडीच रुपये किलो तर कोबीला फक्त सव्वा रूपया किलोचा भाव मिळाला आहे. 20 किलोच्या टोमॅटो क्रेटला 50 रुपये आणि कोबीच्या क्रेटला फक्त 25 रुपये मिळत आहेत.


बाजारात माल घेऊन आलेल्या शेतकऱ्य़ाला चहा पिता येईल एवढेही पैसे या कवडीमोल भावामुळे हातात पडले नाही. व्यापारी शेतकऱ्याकडून जरी मातीमोल दराने भाजीपाला विकत घेत असले तरी ग्राहकांना मात्र कोबी आणि टोमॅटोसाठी नेहमीप्रमाणेच दर द्यावा लागत आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा एकदा व्यापाऱ्यांची मनमानी पाहायला मिळत आहे.

व्यापाऱ्यांच्या मनमानीचा फटका मात्र कष्टकरी शेतकऱ्याला बसत आहे. कांद्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आणल्यानंतर आता टोमॅटोकडून मोठी अपेक्षा होती. मात्र टोमॅटोच्या दराचा आलेख ऐनवेळी घसरला आहे.