अंबाती रायुडू... हा आहे चेन्नई सुपर किंग्समधला एक नवा किंग...


2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर चेन्नई सुपर किंग्सनं यंदाच्या आयपीएल मोसमात मोठ्या धडाक्यात पुनरागमन केलं. सुपर किंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईनं आठपैकी सहा सामन्यांमध्ये विजय साजरा केला आहे. आणि चेन्नईच्या त्या यशाचा प्रमुख शिल्पकार ठरला तो अंबाती रायुडू.

अंबाती रायुडूनं यंदाच्या मोसमातल्या आठ सामन्यांमध्ये अनुक्रमे 22, 39, 49, 12, 79, 82, 46 आणि 41 असा मिळून 370 धावांचा रतीब घातला आहे. त्याचा 156.11 हा स्ट्राईक रेट भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावत आहे. आयपीएलच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजाला दिली जाणारी ऑरेन्ज कॅप सध्या रायुडूच्या डोक्यावर आहे. त्यामुळं चेन्नईच्या ताफ्यातला यंदाच्या मोसमातला एक प्रमुख शिलेदार म्हणून अंबाती रायुडूचा उल्लेख होत आहे.

भारताचा माजी कसोटीवीर संजय मांजरेकरनं अंबाती रायुडूच्या कामगिरीची तारीफ केली आहे. रायुडूच्या कामगिरीचं विश्लेषण करताना मांजरेकर म्हणतो की, रायुडूनं केवळ खराब चेंडूवरच नाही तर चांगल्या चेंडूंवरही षटकार ठोकले आहेत.

अंबाती रायुडू हा आयपीएलच्या पहिल्या दोन मोसमांमध्ये खेळला नव्हता. आयपीएलच्या तिसऱ्या मोसमात म्हणजेच 2010 साली मुंबई इंडियन्सनं त्याला आपल्या ताफ्यात सामील केलं होतं. त्यानंतर सलग सात मोसम रायुडूनं मुंबई इंडियन्सकडून आयपीएल रणांगणात सातत्यपूर्ण कामगिरी बजावली. त्यानं मुंबई इंडियन्सकडून खेळताना 114 सामन्यांत 2416 धावा फटकावल्या होत्या. त्यात 16 खणखणीत अर्धशतकांचा समावेश होता.

आयपीएलच्या निर्देशानुसार, यंदा आठही फ्रँचाईझींनी नव्यानं संघबांधणी केली. त्यासाठी झालेल्या लिलावात मुंबई इंडियन्सचा हा हीरा धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सच्य़ा हाती लागला. त्यामुळं मुंबई इंडियन्सचं नुकसान झालं, पण चेन्नईला सुपर जॅकपॉट लागला.

अंबाती रायुडू हे नाव भारतीय क्रिकेटला तसं नवं नाही. 2004 सालच्या अंडर नाईन्टिन विश्वचषकानंतर रायुडूमधली गुणवत्ता खऱ्या अर्थानं समोर आली. त्यावेळी भारतानं रायुडूच्या नेतृत्वाखाली अंडर नाईन्टिन विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली होती. पण त्यानंतर तो बीसीसीआयची मान्यता नसलेल्या इंडियन क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाला. त्यामुळं रायुडूच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला विराम मिळाला. कारण बीसीसीआयनं आयसीएलमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंवर बंदी घातली होती. बीसीसीआयनं 2010 साली ही बंदी मागं घेतली आणि रायुडूसाठी आयपीएलचे दरवाजे खुले झाले.

अंबाती रायुडूनं आयपीएलमधल्या पदार्पणानंतर, 2013 साली रायुडूनं वन डे क्रिकेटमध्येही पदार्पण केलं. तो 2013 ते 2015 या दोन वर्षांमध्ये भारताकडून 34 वन डे सामन्यांमध्ये खेळला. या कालावधीत त्याच्या नावावर 50.24 च्या सरासरीनं 1050 धावा जमा आहेत. त्याशिवाय रायुडूनं सहा ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांमध्येही भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

चेन्नई सुपर किंग्सच्या या शिलेदाराला यंदाच्या आयपीएल मोसमात गवसलेला सूर पाहता त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीलाही पुन्हा चालना मिळू शकते. टीम इंडियाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाचा शोध आहे. सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांच्यामधली चुरस टीम इंडियाला एक चांगला पर्याय देऊ शकते.