क्राईस्टचर्च (न्यूझीलंड) : शुबमन गिलच्या शतकी खेळीच्या जोरावर अंडर-19 विश्वचषकात भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. शुबमनच्या या खेळीने त्याचं संपूर्ण कुटुंब सध्या प्रचंड आनंदात आहे. एबीपी न्यूजशी खास बातचीत करताना शुबमनच्या वडिलांनी आपला आनंद व्यक्त केला.


'शुबमन आम्हाला आधीच म्हणाला होता की, मी शतक झळकावून येणारच. तसंच पाकिस्तान विरुद्ध मोठी खेळी करणार याचाही त्याला विश्वास होता. त्याने आपले शब्द खरे केले. आज मुलानं देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.' अशी प्रतिक्रिया शुबमनचे वडील लखविंदर गिल यांनी दिली.

उपांत्य सामन्यात नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी पृथ्वी शॉ आणि मनजोत कालराने सुरुवातही चांगली केली. पण 89 धावांवर भारताची पहिला गडी बाद झाला. त्यानंतर आलेल्या शुबमनने शेवटच्या चेंडूपर्यंत धडाकेबाज फलंदाजी करत भारताला 272 धावांचा टप्पा गाठून दिला.

एका बाजूने विकेट जात असतानाही शुबमनने दुसरी बाजू भक्कमपणे लावून धरली होती. त्याने भारतीय डावाच्या शेवटच्या चेंडूवर आपलं शतक पूर्ण केलं. या विश्वचषकात शतक झळकावणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

संबंधित बातम्या :
शुबमन गिलचं नाबाद शतक, अनेक विक्रम नावावर

अंडर-19 विश्वचषक : पाकवर 203 धावांनी मात, भारताची फायनलमध्ये धडक