पाकिस्तान क्रिकेट संघासाठी शोएब मलिकने 287 वनडे सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मी हा निर्णय घेण्याचे वर्षांपूर्वीच ठरवले होते, असे मलिकने पत्रकार परिषदेत सांगितले. एकदिवसीय सामन्यातून निवृत्तीनंतर कुटुंबामध्ये अधिक वेळ देऊ शकेल. टी-20 क्रिकेटवर लक्ष देऊ शकेल. माझ्या आवडत्या वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेत असल्याचे दुःख होत असल्याचेही शोएब म्हणाला.
शोएबने आपल्या निवृत्तीबाबत व्टिटरवरूनही याबद्दल माहिती दिली आहे. 'आज मी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घेत आहे. त्या सर्व खेळाडूंना धन्यवाद, ज्यांनी मला साथ दिली आहे. त्या सर्व प्रशिक्षकांचे आभार , ज्यांनी मला प्रशिक्षित केले आहे. त्याचबरोबर कुटुंब, मित्र, मीडियाचे ही आभार आणि सर्वात महत्वाचे माझे फॅन्स, पाकिस्तान जिंदाबाद', असे ट्वीट शोएबने केले आहे.
1999 साली वेस्टइंडीजविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले होते. एकदिवसीय क्रिकेटमध्ये शोएबने 34.55 च्या सरासरीने 7534धावा केल्या आहेत. शोएबच्या नावावर 44 अर्धशतकं आणि 9 शतकं आहेत. फलंदाजीसोबतच शोएबने गोलंदाजीमध्ये देखील आपला करिष्मा दाखवला आहे. त्याने एकदिवसीय सामन्यात 158 विकेट्स घेतल्या आहेत.
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर 94 धावांनी मात करुन, विश्वचषकाच्या नवव्या सामन्यात पाचवा विजय साजरा केला. या विजयाने पाकिस्तानला गुणतालिकेत न्यूझीलंडसोबत 11-11 गुणांची बरोबरीही साधून दिली. परंतु या सामन्यात नेट रनरेटचं समीकरण राखण्यात अपयश आल्याने पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.
पाकिस्तानला उपांत्य फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी या सामन्यात बांगलादेशला अवघ्या सहा धावांमध्ये रोखणे आवश्यक होते. परंतु बांगलादेशने सहा धावांचा टप्पा सहज ओलांडून 221 धावांची मजल मारली. त्यामुळे पाकिस्तानचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे. त्याआधी पाकिस्ताननं 50 षटकांत नऊ बाद 315 धावांची मजल मारली होती.