मुंबई : भारताचा सलामीचा फलंदाज शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या तीन वन डे सामन्यांमधून माघार घेतली आहे. शिखर धवन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, त्यामुळे त्याची गैरहजेरी ही टीम इंडियासाठी एकप्रकारे झटकाच मानला जात आहे.
शिखरची पत्नी आयशा आजारी असून, तिच्या देखभालीसाठी त्याने भारताच्या वन डे संघामधून माघार घेण्याची परवानगी मागितली होती. शिखरच्या या विनंतीला बीसीसीआयने मंजुरी दिली आहे.
याआधी आईच्या आजारपणासाठी शिखर धवन श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेतील काही सामने खेळू शकला नव्हता.
पण त्याच्याऐवजी भारताच्या वन डे संघात कुणाचाही समावेश न करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या निवड समितीनं घेतला आहे. 16 सदस्यांच्या संघाची आधीच निवड झाली आहे. त्यामुळे त्यापैकीच एका खेळाडूला धवनच्या जागी खेळवलं जाईल.