मुंबई : 'द ब्लू व्हेल' गेम प्रकरणात दाखल असलेल्या याचिकेवरील सुनावणीत, फेसबुक आणि गुगल दोन्ही कंपन्यांना मुंबई उच्च न्यायालयाने एका आठवड्यात प्रतिज्ञापत्रात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.


प्रतिवादींना पाठवलेली नोटीस काल म्हणजे बुधवारी फेसबुक आणि गुगलच्या भारतातील पत्त्यांवर मिळाली असल्याने उत्तर देण्यास दोन्ही कंपन्यांनी वेळ मागून घेतली आहे. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने फेसबुक आणि गुगल दोघांनाही फटकारलं. "इथे मुलांचे जीव जात आहेत आणि आपण याबाबत अजिबात गंभीर दिसत नाहीत" त्यामुळे आपण लवकरात लवकर आपलं उत्तर सादर करा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.

जीवघेणा ऑनलाईन गेम 'द ब्लू व्हेल' विरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. सिटीझन सर्कल फॉर सोशल वेलफेअर अँड एज्युकेशन या सेवाभावी संस्थेच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्यांनी या याचिकेत गुगल, फेसबुक, याहू यांच्यासह मुंबई पोलिसांच्या सायबर सेललाही प्रतिवादी बनवलं आहे.

प्रशासनाने द ब्लू व्हेल गेमशी संबंधित तक्रारी आणि समस्यांसाठी एक हेल्पलाईन सुरु करावी. जेणेकरुन या गेमच्या आहारी जाणारी लहान मुलं तसेच त्यांच्या पालकांना यासंदर्भात तातडीने मदत करता येईल, अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे.

या प्रकरणात आज मुंबई सायबर सेल आणि राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करायच होतं, मात्र सायबर सेल आणि राज्य सरकारकडून कोणीही उपस्थित नव्हतं. त्यामुळे याबाबत सरकारही फारसं गंभीर नसल्याचंदेखील समोर आलं आहे.

रशियातून उदयास आलेल्या या गेममध्ये खेळणारा आणि त्याचा अदृश्य मार्गदर्शक यांच्यात अजाणतेपणी एक दृढ नातं निर्माण होतं. ठराविक टप्यानंतर खेळणाऱ्याला त्याचा मार्गदर्शक एक-एक काम सांगत जातो. पुढच्या टप्यावर पोहचण्यालाठी ते काम पूर्ण करुन त्याचा पुरावा देणं खेळणाऱ्याला बंधनकारक असतं. या खेळात शेवटच्या टप्यावर खेळणाऱ्याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं जातं.