मुंबई : हवामान विभागाने वर्तवलेल्या चुकीच्या अंदाजाचा बळी आता फक्त शेतकरीच नाही, तर सरकारही ठरताना दिसतं आहे. कारण पावसाच्या चुकीच्या अंदाजाबद्दल खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवामान विभागाबद्दल, हवामान बदल आणि भू विज्ञान मंत्रालयाला नाराजीचं पत्र लिहिलं आहे.
29 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीनंतर हवामान विभागाने 30 ऑगस्टलाही मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे मुंबईतली सरकारी कार्यालयं बंद ठेवण्यात आली होती. फक्त अत्यावश्यक सेवाच यावेळी सुरु होत्या. शिवाय मुसळधार पावसाचा अंदाज घेत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 30 ऑगस्टला मुंबईतील सर्व शाळा-महाविद्यालये यांना सुट्टी जाहीर केली होती.
मात्र 30 ऑगस्टला पाऊस पडला नाही. दिवसभर चक्क ऊन पडलं होतं. सुट्टी दिल्यामुळे शासकीय कामाचा दिवस वाया गेला. थोडक्यात हवामान विभागाचा 30 ऑगस्टचा मुसळधार पावसाचा अंदाज चुकला होता.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हवामान विभागाशी संबंधित केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली.