मुंबई : आयपीएलमधील स्टार खेळाडू आणि टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन पुढच्या आयपीएल मोसमात नव्या संघात दिसू शकतो. काही वृत्तांनुसार, शिखर धवन सनरायझर्स हैदराबादची साथ सोडून मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. धवन हैदराबादच्या फ्रँचायझींवर नाराज असल्यामुळे त्याने संघ सोडण्याची तयारी केल्याची चर्चा आहे.


शिखर धवन 2013 पासून सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे. पण अकराव्या मोसमापूर्वी झालेल्या ऑक्शनपूर्वी टीमने त्याला रिटेन केलं नसल्यामुळे तो नाराज आहे. हैदराबादने राईट टू मॅच कार्डचा वापर करुन शिखर धवनला खरेदी केलं होतं. त्याच्यावर 5.2 कोटी रुपयांची बोली लागली होती.

शिखर धवनला अत्यंत कमी किंमत मिळाल्यामुळेही तो नाराज असल्याचं बोललं जातं. दुसरीकडे रोहित शर्मा (15 कोटी), महेंद्र सिंह धोनी (15 कोटी) आणि विराट कोहली (17 कोटी) हे सर्वात महागडे खेळाडू ठरले होते.

सनरायझर्स हैदराबादच्या अधिकाऱ्याने 'मुंबई मिरर'शी बोलताना सांगितलं, की ट्रेड ऑफच्या माध्यमातून फ्रँचायझींना काही चांगले खेळाडू मिळाले तर हे शक्य आहे. म्हणजेच शिखर धवनच्या मोबदल्यात हैदराबादला काही चांगले खेळाडू मिळाले तर त्याला रिलीज केलं जाईल. मुंबई इंडियन्सनेही ट्रेड ऑफच्या माध्यमातून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं आहे. या बदल्यात बांगलादेशचा मुस्ताफिजुर रहमान आणि श्रीलंकेच्या अकिला धनंजयला रिलीज केलं होतं.

टीम इंडियाकडून रोहित शर्मासोबत अनेक अविस्मरणीय खेळी करणाऱ्या धवनसाठी मुंबई इंडियन उत्सुक आहेच. शिवाय दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाबही शिखर धवनसाठी उत्सुक आहे.

आयपीएलच्या बाराव्या मोसमासाठी ऑक्शन डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. ऑक्शनच्या एक आठवडा अगोदर ट्रेड ऑफ विंडो बंद होईल.

दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएल करिअरची सुरुवात करणाऱ्या शिखर धवनने 2009 मध्ये मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलं होतं. दोन वर्षानंतर त्याला डेक्कन चार्जरने खरेदी केलं. ही फ्रंचायझी बंद झाल्यानंतर धवन सनरायझर्स हैदराबादकडून खेळत होता.