मुंबई : 2019 च्या निवडणुका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना-भाजपच्या युतीच्या निर्णयावर खलबतं सुरु झाली आहेत. एकीकडे युतीचा निर्णय लवकर घ्या, अन्यथा लोकसभेसोबतच विधानसभेच्या निवडणुका लावू, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती मिळते आहे. मात्र, असं कोणतंही अल्टिमेटम दिलं नसल्याचा दावा शिवसेनेतल्या नेत्यांनी केला आहे.

भाजपची महत्त्वाची बैठक

याच सर्व पाश्वभूमीवर काल रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांसह महत्वाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसेनेला दिलेल्या अल्लटिमेटम आणि युतीसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.

सेनेला भाजपचा अल्टिमेटम

युतीबाबत लवकर निर्णय घ्या, अन्यथा दोन्ही निवडणुकांना एकत्रित सामोरे जा, असा इशारा भाजपने शिवसेनेला दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुढील वर्षी येऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपसोबत युती करायची, किंवा नाही करायची, जो काही निर्णय असेल, तर तो लवकर जाहीर करा, असा इशारा भाजपने दिल्याची माहिती आहे. शिवसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे.

भाजपच्या अल्टिमेटमवर शिवसेनेने गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे. युतीचा निर्णय न झाल्यास विधानसभा आणि लोकसभा या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्याचा दबाव भाजपने टाकल्याचीही माहिती आहे.

महाराष्ट्राबाबत एबीपी माझा-सी व्होटरचा सर्वे काय सांगतो?

महाराष्ट्रात सध्या भाजपच्या 22 तर शिवसेनेच्या 18 जागा आहेत. 'एबीपी माझा'ने सी व्होटरच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणातून देशाचा मूड जाणून घेण्यात आला होता. त्यानुसार महाराष्ट्रातील एनडीएच्या जागा कमी होऊ शकतात, मात्र स्वतंत्र लढल्यास शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. लोकसभेच्या 48 जागांची संभाव्य आकडेवारी -

सर्व स्वतंत्र पक्ष स्वतंत्र लढल्यास -


भाजप - 22, काँग्रेस - 11,  राष्ट्रवादी - 8, शिवसेना - 7

भाजप-शिवसेना युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाल्यास

एनडीए  - 36, यूपीए - 12

शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढले, मात्र राष्ट्रवादी-काँग्रेस (आघाडी) एकत्र लढल्यास

एनडीए - 16, यूपीए - 30,  शिवसेना - 2