नाशिक : महाराष्ट्राची माती ही संतांना जन्म देणारी माती आहे. नाशिक आणि महाराष्ट्राच्या मातीला मी नमस्कार करतो, अशा शब्दात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्राबद्दल गौरवोद्गार काढले. नाशिकमधील मांगीतुंगीमध्ये आज विश्वशांती अहिंसा संमेलन पार पडलं. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह अनेक यावेळी मान्यवर उपस्थित होते.


‘मांगीतुंगी’च्या पायथ्याशी जैन धर्माचे पहिले तिर्थंकर भगवान श्री ऋषभदेव यांची 108 फूटांची मूर्ती साकारण्यात आली. यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, भगवान श्री ऋषभदेव यांची मूर्तीच आपल्याला मापदंड घालून देते. अहिंसा, सदाचाराचा उपयोग जीवनात करा आणि त्याचं पालनही करा. शांततेचं वातावरण निर्माण करा, असं आवाहन राष्ट्रपतींनी उपस्थितांना केलं. या संमेलनाला जैन धर्मातील हजारो प्रतिनिधी उपस्थित होते.


भारत सरकारने मानवी करुणेने प्रेरित अशा अनेक योजना जनतेचत्या हितासाठी राबविल्या आहेत. याचा देशातील गोरगरिबांना लाभ होत आहे, असंही राष्ट्रपती रामनाथ म्हणाले.


मी नुकताच तझाकिस्तानला गेलो होतो. तेथे अनेक दिवसांपासून पाऊस नव्हता. तेथील राष्ट्रपतींनी एकूण परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तशीच चिंता व्यक्त करत आहेत.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याठिकाणी बोलताना दुष्काळी स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. तर दुष्काळसदृश्य भागात तातडीने उपाययोजना सुरु करण्यात येतील असं आश्वासन दिलं.