मुंबई : शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं शशांक मनोहर यांनी सांगितलं.
आयसीसीच्या प्रशासकीय ढाचात बदल झाल्यानंतर, आयसीसीचे स्वतंत्र अध्यक्ष म्हणून निवडून आलेले शशांक मनोहर हे पहिलेच पदाधिकारी होते. त्यांच्या अध्यक्षपदाची मुदत ही दोन वर्षांची होती. पण मनोहर यांनी केवळ दहा महिन्यांमध्येच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
मनोहर यांनी आपला राजीनामा ई-मेलने आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांना पाठवला आहे. पण या निर्णयामागे कोणतं एखादं विशिष्ट कारण आहे का, हे आपल्या राजीनामापत्रात त्यांनी नमूद केलेलं नाही.
महत्त्वाचं म्हणजे आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी शशांक मनोहर यांनी बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.
...म्हणून मनोहरांनी राजीनामा दिला!
शशांक मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्यापासून, बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड अँड क्रिकेट बोर्ड यांची आयसीसीतली मक्तेदारी मोडून काढण्यासाठी नेटाने लढा दिला. बीसीसीआय, क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि ईसीबी यांना आयसीसीच्या नफ्यात अधिक वाटा देणारा ठराव 2014 सालापासून चर्चेला होता. आयसीसी संलग्न तीन बड्या असोसिएशन्सचा तो प्रयत्न मोडून काढण्यासाठी मनोहर यांनी कंबर कसली होती.
यासंदर्भात आयसीसीच्या एप्रिलमधल्या बैठकीत घटनात्मक आणि आर्थिक सुधारणांचा विचार होण्याची चिन्हं होती. त्यासाठी किमान दोन तृतीयांश बहुमताची आवश्यकता होती. पण बांगलादेश, श्रीलंका आणि झिम्बाब्वेला आपल्या बाजूने वळवून मनोहरांचा प्रयत्न हाणून पाडण्याची तयारी केली होती, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच मनोहर यांनी आयसीसीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन आपला स्वाभिमानी बाणा जपला असल्याचं बोललं जात आहे.
संबंधित बातम्या
शशांक मनोहर आयसीसीचे नवे चेअरमन!
BCCI अध्यक्षपदाच्या राजीनाम्यास भाग पाडलं : शशांक मनोहर
शशांक मनोहर यांचा राजीनामा, शरद पवार BCCI चे नवे अध्यक्ष?