इस्लामाबाद : उत्तर प्रदेशात भाजपने मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. फक्त भारतच नव्हे, तर शेजारी पाकिस्तानातील एका चिमुरडीनेही मोदींचं अभिनंदन केलं आहे.
'जास्तीत जास्त भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करा आणि दोन देशांना जोडणारे शांततेचा सेतू व्हा', या आशयाचं पत्र पाकिस्तानातील 11 वर्षांच्या अकीदत नावीद या विद्यार्थिनीने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलं आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये शांतता नांदण्याची आवश्यकता आहे. फक्त पंतप्रधान मोदीच या प्रक्रियाला गती देऊ शकतात, असा विश्वास तिने पत्रात व्यक्त केला आहे. तुम्ही भारतीयांची मनं जिंकल्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणूक जिंकला असावात, असं तिने लिहिलं आहे.
भारत आणि पाक या दोन्ही देशांना शांततेची गरज आहे. यापुढे बंदुकीच्या गोळ्या नाही, तर पुस्तकं खरेदी करुया, बंदुका नाही तर गरिबांसाठी औषधं खरेदी करण्याचा निर्धार करुया, असं अकीदतने दोन पानी पत्रात लिहिलं आहे.