तर वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर शिलेदारांच्या साथीनं शार्दूल ठाकूरचाही संघात समावेश करण्यात आलाय. शार्दूल ठाकूर हा रणजीमध्ये मुंबईच्या संघाचं प्रतिनिधित्त्व करतो.
शार्दूलनं यंदाच्या रणजी मोसमात 11 सामन्यांमध्ये 41 विकेट्स काढल्या होत्या. तसंच रणजी फायनलमध्ये आठ विकेट्स काढून मुंबईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
शार्दूल ठाकूर हा मूळचा पालघरचा. तो क्रिकेटसाठी पालघर ते चर्चगेट असा प्रवास रोज करायचा. क्रिकेटमध्येच करिअर करण्याचं त्याचं ध्येय होतं. त्याच कष्टाचं परिश्रम म्हणजे आज त्याची टीम इंडियात झालेली निवड होय.
शार्दूल सध्या मुंबईत काका-काकींकडे राहतो. दररोज पालघरवरुन अप-डाऊन करण्यात खूप वेळ जातो. त्यामुळे क्रिकेटसाठी कमी वेळ मिळतो. त्यामुळेच क्रिकेटला अधिक वेळ मिळावा म्हणून तो काका-काकींकडे शिफ्ट झाला. आता त्याचा वेळ वाचतोय. हा वाचलेला वेळ आणि एनर्जी टीम इंडियाकडून खेळताना वापरायची आहे, असा निश्चय शार्दूलने व्यक्त केला.
11 जूनपासून झिम्बाब्वे दौरा
टीम इंडिया 11 जूनपासून झिम्बाब्वेमध्ये तीन वन डे आणि दोन ट्वेन्टी20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडीजला रवाना होईल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारताच्या संघातून विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवनला विश्रांती देण्यात आली असून मुंबईचा धवल कुलकर्णी, महाराष्ट्राचा केदार जाधव आणि विदर्भाचा फैज फजल यांचा वन डे आणि ट्वेन्टी20 संघात समावेश करण्यात आला आहे.
तर वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी भारताच्या कसोटी संघाचं उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी वन डे संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), के एल राहुल, फैज फैजल, मनीष पांडे, करुण नायर, अंबाती रायुडू, रिषी धवन, अक्षर पटेल, जयंत यादव, धवल कुलकर्णी, जसप्रीत बुमराह, बरिंदर सरण, मंदीप सिंह, केदार जाधव, जयदेव उनाडटकर, यजुवेंद्र चहल
वेस्ट इंडिज कसोटी मालिका – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, के एल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, रिद्धिमन साहा, आर. अश्विन, अमित मिश्रा, रवींद्र जाडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद सामी, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, शार्दूल ठाकूर, स्टुअर्ट बिन्नी