नवी दिल्ली : मोदी सरकारच्या द्वितीय वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमाचं सूत्रसंचालन बिग बी अमिताभ बच्चन करण्याची शक्यता आहे. 28 मे रोजी इंडिया गेटवर होणाऱ्या 5 तासांच्या कार्यक्रमासाठी बिग बींचा विचार केला जात आहे.
'हिंदुस्तान टाइम्स' या वृत्तपत्राने या संदर्भात बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवर नेते आणि सेलिब्रेटीज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. दूरदर्शनवरुन या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येईल.
गेल्या दोन वर्षात एनडीए सरकारच्या वाटचालीबद्दल या कार्यक्रमात माहिती देण्यात येणार आहे. त्याशिवाय जनधन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, दीन दयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना, एलईडी बल्ब डिस्ट्रीब्युशन स्कीम, डिजीटल इंडिया, स्वच्छ भारत यासारख्या उपक्रमांचा लेखाजोखा मांडण्यात येईल.
भाजप सरकारच्या पुढच्या काळातील योजनांवर काही टॉक शोही होणार आङेत. त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रमांचीही मेजवानी असेल.