मुंबई : मूळचा पालघरचा आणि राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा शार्दूल ठाकूरचा इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या वन डे संघात समावेश करण्यात आला आहे. 12 जूनपासून तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. विराट कोहलीची टीम इंडिया सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातल्या आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यात खेळताना जसप्रीत बुमराचा डावा अंगठा गंभीररित्या दुखावला होता. बुमराच्या अंगठ्यावर इंग्लंडमध्येच शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्याला सक्तीच्या विश्रांतीसाठी मायदेशी पाठवण्यात येईल. परिणामी तो भारतीय संघातून बाहेर होता. त्यामुळे बुमराऐवजी मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूरचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आयपीएलच्या अकराव्या मोसमात शार्दूल ठाकूरची कामगिरी उत्तम  होती. इंग्लंडविरुद्धचा पहिला वन डे सामना 12 जुलै रोजी नॉटिंग्हममध्ये, दुसरा सामना 14 जुलै रोजी लंडनमध्ये आणि तिसरा सामना 17 जुलै रोजी लीड्समध्ये खेळवण्यात येईल.