कार्डिफ :  इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवत इंग्लंडला धूळ चारली होती. आता विराट कोहलीची टीम इंडिया मालिका विजयासाठी मैदानात उतरणार आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज खेळण्यात येणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दहा वाजता हा सामना सुरु होईल.


इंग्लंड विरुद्ध भारत टी 20 मालिका तीन सामन्यांची आहे. पहिल्या सामन्यात लोकेश राहुलचं नाबाद शतक आणि कुलदीप यादवनं घेतलेल्या पाच विकेट्सच्या बळावर भारतीय संघाने इंग्लंडला 8 विकेट्सने धूळ चारली होती.  इंग्लंडवर मिळवलेल्या या विजयाने भारतीय संघाचं मनोधैर्य आणखी उंचावलंय.

तर दुसरीकडे मालिकेतील आपलं आव्हान कायम राखण्यासाठी इंग्लंडला विजयाची गरज आहे.

भारताचा टी 20 विक्रम

भारताने नोव्हेंबर 2017 पासून एकही टी 20 मालिका गमावलेली नाही. ही मालिका जिंकल्यास भारताचा सलग सहावा मालिका विजय ठरणार आहे. या मालिका विजयांची सुरुवात भारताने 2017 मध्ये न्यूझीलंडला हरवत केली होती.

भारताचे आयसीसी रँकिंग

आयसीसीच्या टी 20  रँकिंगनुसार सध्या भारत 125 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून इंग्लंड 116 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. पाकिस्तान पहिल्या स्थानावर आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे.

इंग्लंडसाठीचे अडथळे

इंग्लंडसाठी सर्वांत मोठा अडथळा ठरतो आहे तो भारताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव. गेल्या सामन्यात कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडच्या फलंदाजांनी नांगी टाकली होती. या सामन्यात कुलदीप यादवनं पाच निर्णायक विकेट्स घेतल्या. तर भारताचे फलंदाजसुद्धा इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरत आहे.