नागपूर: सिडको जमीन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर तुफान हल्लाबोल केल्यानंतर, आता मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी एक पाऊल मागे घेणंच पसंत केलं. कारण नवी मुंबईतील कथित सिडको जमीन घोटाळा प्रकरणात झालेले सर्व व्यवहार स्थगित करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानपरिषदेत त्यांनी ही घोषणा केली.


मुख्यमंत्री म्हणाले, “सिडको जमीन प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. त्या अनुषंगाने या संपूर्ण व्यवहाराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे. या जमिनीची विक्री होणार नाही याची खबरदारी घ्यावी. त्याचप्रमाणे महसूल विभागामार्फत कळवण्यात आलं आहे की कोणताही थर्ड पार्टी इंटरेस्ट निर्माण होऊ नये, याबाबतची घबरदारी घेण्यात येईल. जोपर्यंत न्यायलयीन चौकशी होऊन अहवाल येत नाही, तोपर्यंत यासंबंधी कोणतीही कारवाई, जसे विक्री, हस्तांतरण, भाड्याने देणं या सर्वांवर प्रतिबंध घालण्यात आला आहे”.



हा तर आमचा विजय: काँग्रेस

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सिडको जमीन व्यवहाराला स्थगिती देऊन न्यायालयीन चौकशी करणे हीच आमची मागणी होती. मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य करणं यातून तेच सिद्ध होतंय की आमच्या आरोपात तथ्य आहे. त्यामुळे हा आमचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली आहे.

काँग्रेसचा आरोप

नवी मुंबईतील सिडकोच्या 24 एकर जमीन व्यवहारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली १७६७ कोटी रुपयांची जमीन बांधकाम व्यावसायिक मनिष भतीजा यांना अवघ्या साडेतीन कोटी रुपयांत विकण्यात आली. हा व्यवहार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडील नगरविकास खाते, सिडको आणि भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्या संगनमतानं झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

हे सर्व आरोप काल मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावले. आणि आज हे व्यवहार स्थगित केले आहेत.

मुख्यमंत्री काल काय म्हणाले?

"बाबा तुम्हाला अनेकवेळा माहित नसतं, कुणाचंही ऐकून, माहिती न घेता आरोप करता. सज्जन माणसं असं करत नसतात, माहिती घ्या आणि आरोप करा," असा हल्लाबोल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केला.

सिडकोच्या जमीन घोटाळ्याच्या विरोधकांच्या आरोपांना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत उत्तर दिलं.

जमीन व्यवहाराचे अधिकार पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत, त्यामुळे त्याचा मंत्र्यांशी किंवा मंत्रालयाशी संबंध नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

मी राजीनामा देणार नाहीच, पण माझ्यावर खोटे आरोप करणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कथित सिडको जमीन घोटाळाप्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा केली. त्याबरोबर पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळातील 200 सात बारा प्रकरणीही चौकशी होणार आहे.

संबंधित बातम्या

सज्जन माणसं माहितीविना आरोप करत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा पृथ्वीराज चव्हाणांवर हल्ला  

माझा विशेष : 1700 कोटींची जमीन 3 कोटीत जातेच कशी?  

प्रसाद लाड यांचा काँग्रेस नेत्यांवर 500 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा  

मुख्यमंत्र्यांकडून 1767 कोटींची जमीन 3 कोटीत बिल्डरला : काँग्रेस