नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न हा राजस्थान रॉयल्सचा मेन्टॉर या नात्याने यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. वॉर्नने कर्णधार आणि प्रशिक्षक या नात्याने राजस्थान रॉयल्सला पहिल्या आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं. तोच वॉर्न दहा वर्षांनी एका नव्या भूमिकेत राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात सामील झाला आहे.


राजस्थान रॉयल्सही यंदा दोन वर्षांनी आयपीएलमध्ये पुनरागमन करत आहे. 2013 सालच्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात राजस्थान रॉयल्सवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. मुंबईचा माजी रणजीपटू झुबिन भरुचाही क्रिकेट प्रमुख या नात्याने राजस्थान रॉयल्सच्या ताफ्यात परतणार आहे.

''राजस्थान रॉयल्समध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. या संघाचं माझ्या क्रिकेटच्या प्रवासात मोलाचं स्थान आहे. आमच्याकडे युवा आणि उत्साही खेळाडू आहेत आणि त्यांच्यासोबत खेळण्यासाठी उत्सुक आहे,'' असं शेन वॉर्नने सांगितलं.

आयपीएलच्या पहिल्याच मोसमात चॅम्पियन बनणाऱ्या राजस्थान रॉयल्सचं यंदा दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन होत आहे. राजस्थानने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला रिटेन केलं, तर अनेक दिग्गज खेळाडूंवर कोट्यवधी रुपयांची बोली लावली. राजस्थानचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ असेल, हे अगोदरच स्पष्ट होतं. मात्र सपोर्ट स्टाफची घोषणा अद्याप झालेली नव्हती.

राजस्थान रॉयल्स (एकूण खेळाडू -23)

स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अजिंक्य रहाणे, स्टुअर्ट बिन्नी, संजू सॅमसन, जॉस बटलर, राहुल त्रिपाठी, डीअर्सी शॉर्ट, जोफ्रा आर्चर, क्रिष्णप्पा गौतम, धवल कुलकर्णी, जयदेव उनाडकट, अंकित शर्मा, अनुरित सिंह, झहीर खान, श्रेयस गोपाल, सुधासेन मिधुन, प्रशांत चोप्रा, बेन लाफलिन, महिपाल लोमरोर, जतिन सक्सेना, आर्यमान बिर्ला, दुष्मंथा चमिरा