बॉल टॅम्परिंग प्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्मिथ, वॉर्नर आणि बॅनक्राफ्टवर बंदीची कारवाई केली आहे. याच निर्णयाबाबत वॉर्नने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यावेळी त्याने सचिनचंही नाव या वादात ओढलं.
या पोस्टमध्ये वॉर्न असं म्हणतो की, 'या मालिकेतील विरोधी संघाचा (द. आफ्रिका) कर्णधार फॅफ ड्यू प्लेसी देखील अशाच प्रकरणात दोषी आढळला होता. त्यांचा वेगवान गोलंदाज फिलेंडर देखील दोषी ठरला होता. ज्या खेळाडूंनी आजपर्यंत बॉल टॅम्परिंग केलं त्यांच्या नावाची यादी बरीच मोठी आहे. यात सचिन तेंडुलकर आणि माइक अथर्टन यासारख्या दिग्गज खेळाडूंचा देखील समावेश आहे.
2001 साली पोर्ट एलिझाबेथमध्ये भारत आणि द. आफ्रिकेदरम्यान कसोटी सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकर चेंडूची सीम साफ करत असल्याचं कॅमेराने शूट केलं होतं. यानंतर अंपायर माइक डेनिसने सचिनवर एका सामन्याची बंदी आणि एक वर्षासाठी निलंबन करण्यात यावं असं म्हटलं होतं. पण सचिनवरील हे आरोप सिद्ध होऊ शकले नाही. त्यामुळे आयसीसीने सचिनवर कोणतीही कारवाई केली नव्हती.
दरम्यान, स्मिथ आणि वॉर्नरवर करण्यात आलेल्या कारवाईबाबतही वॉर्नने नाराजी व्यक्त केली आहे. 'बॉल टॅम्परिंगमुळे आस्ट्रेलिया चाहत्यांप्रमाणे मी देखील प्रचंड निराश आहे. त्यांनी केलेली चूक आपण नाकारु शकत नाही. पण या चुकीसाठी देण्यात आलेली शिक्षा ही फारच कठोर आहे. त्यांनी केलेली चूक गंभीर होती. त्याची शिक्षा त्यांना मिळायलाच हवी. पण मला असं अजिबात वाटत नाही की, त्यांच्यावर एक वर्षाची बंदी हवी.' असंही वॉर्नने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.