मुंबईएकीकडे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचं 76 कोटींचं कर्ज, बँकेने अवघ्या 25 कोटीत सेटलमेंट केलं  असताना, आता कॉर्पोरेट जगतातील मोठी डील समोर येत आहे.


व्हिडीओकॉनचे सर्वेसर्वा वेणुगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँक यांच्यातील ही डील आहे.

धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला 20 बँकांच्या ग्रुपनं कर्ज दिलं होतं. ज्यात आयसीआयसीआय बँकेचा वाटा 10 टक्के होता. मात्र धूत यांनी आयसीआयसीआयकडून मिळणाऱ्या कर्जाच्या बदल्यात चंदा कोचर यांचे पती दीपक यांच्यासोबत मिळून न्यू पॉवर रिन्यूएबल नावानं कंपनी उघडली. ज्यात दीपक यांची 50 टक्क्यांची भागीदारी होती.

हा सरळ सरळ भ्रष्टाचार असल्याचा आरोप करत शेअरहोल्डर अरविंद गुप्तांनी थेट पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेणुगोपाल धूत आणि आयसीआसीआय बँकेच्या सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर आणि त्यांच्या दोन नातेवाईकांनी मिळून डिसेंबर 2008 मध्ये एक कंपनी स्थापन केली. या कंपनीला ‘घरच्याच’ आयसीआसीआय बँकेने तब्बल 64 कोटी रुपयांचं कर्ज दिलं.

मात्र अवघ्या काही दिवसात या कंपनीची मालकी अवघ्या 9 लाख रुपयात दीपक कोचर यांना मिळाली. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

दीपक कोचर यांना अवघ्या 9 लाखात कंपनी देणाऱ्या वेणुगोपाल धूत यांना, सहा महिन्यानंतर चंदा कोचर यांच्या आयसीआयसीआय बँकेने मोठं गिफ्ट दिलं. धूत यांच्या व्हिडीओकॉन ग्रुपला आयसीआयसीआय बँकेने थोडे थोडकं नाही तर तब्बल 3 हजार 2 50 कोटी रुपयांचं कर्ज मिळालं. मात्र त्यातील 86 टक्के कर्ज म्हणजेच 2 हजार 810 कोटी रुपयांची थकबाकी आहे. पण आयसीआयसीआय बँकेने वेणुगोपाल धूत यांच्यावर मेहरबानी दाखवत, 2017 मध्ये त्यांचं खातं NPA म्हणजेच एकप्रकारे बुडीत दाखवलं.

आयसीआयसीआय बँकेचं स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून आयसीआयसीआय बँक आणि एमडी चंदा कोचर यांच्याबाबत अनेक अफवा उठवल्या जात आहेत. 2016 मध्येही अशाच अफवांचं पेव फुटलं होतं, तेव्हा त्याचं योग्य स्पष्टीकरण देण्यात आलं होतं. मात्र तरीही अफवा उठवून बँकेला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं जातंय.

आयसीआयसीआय बँकेच्या बोर्डाला व्यवस्थापकीय संचालक चंदा कोचर यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. वस्तुस्थितीचा अभ्यास केल्यानंतर भ्रष्टाचार आणि फेव्हरिझम केल्याच्या आरोपात कुठलंही तथ्य नसल्याचं दिसतंय.