मुंबई : आयसीसीने काळ्या यादीत समावेश केलेल्या एका बुकीशी दूरध्वनीवर संभाषण केल्याप्रकरणी बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब अल हसन अडचणीत आला आहे. आयसीसीच्या ॲण्टी करप्शन युनिटने केलेल्या तपासणीत शाकिबने काही वर्षांपूर्वी एका बुकीशी दूरध्वनीवर संवाद साधल्याचं आढळून आलं. त्याने या घटनेची कल्पना आयसीसी किंवा बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही प्रतिनिधीला दिलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात शकिब अल हसनवर दीड वर्षांच्या बंदीची कारवाई होऊ शकते. परिणामी त्याला बांगलादेश संघाच्या आगामी भारत दौऱ्याला मुकावं लागणार आहे.


शाकिब अल हसनला दोन वर्षांपूर्वी फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. सामन्याआधी बुकीने शाकिब अल हसनशी संपर्क साधला होता. प्रोटोकॉलनुसार, फिक्सिंगची ऑफर मिळताच शाकिब अल हसनने आयसीसीशी संपर्क करायला हवा होता. परंतु त्याने असं केलं नाही. आयसीसीचं अॅण्टी करप्शन युनिट संशयितांचे कॉल ट्रॅकिंग करत होतं. यादरम्यानच समजलं की, शाकिबने एका ब्लॅकलिस्टेड बुकीशी संभाषण केलं होतं.

शाकिबला फिक्सिंगची ऑफर मिळण्याची कुणकुण आयसीसीच्या अॅण्टी करप्शन युनिटला लागली आणि या विषयावर त्याच्याशी बातचीत केली. यावेळी शाकिब अल हसनने त्याची चूक मान्य केलं. मी बुकीची ऑफर गांभीर्याने घेतली नाही, त्यामुळेच ही बाब आयसीसीला सांगितली नाही, असं शाकिब अल हसनने आयसीसीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं.

या अडचणी असतानाच शाकिब भारताविरुद्धच्या तीन ट्वेण्टी 20 आणि दो कसोटी सामन्यांच्या मालिकेला मुकण्याची शक्यता आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 3 नोव्हेंबरपासून मालिकेला सुरुवात होणार आहे. तर दुसरा टी20 सामना 7 नोव्हेंबर रोजी राजकोटमध्ये खेळवला जाईल. तिसरा सामना 10 नोव्हेंबर रोजी नागपूरमध्ये होणार आहे. याशिया कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. तर 22 नोव्हेंबर रोजी दुसरा कसोटी सामना खेळवला जाईल.