जळगाव : राजकारणातील चाळीस वर्षांच्या कारकीर्दीत अनेक किस्से आहेत. हे सर्व किस्से आत्मचरित्राद्वारे उलगडणार असल्याचं भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. एकनाथ खडसेंनी काल जळगावातील माध्यम प्रतिनिधींसोबत फराळ घेतला. त्यावेळी पक्षाकडून न्याय मिळेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.


भाजपच्या स्थापनेपासून पक्ष वाढीसाठी लढत आहे. माझ्यावर झालेल्या सर्व आरोपांची चौकशी झाली आहे. या चौकशीत काहीही निष्पन्न झालेले नाही, तरीही माझे तिकीट का कापले? याचे उत्तर मला मिळाले नाही.


मुलगी रोहिणी खडसेंना उमेदवारी देऊ नका, असा सल्ला आपण पक्षाला दिला होता. मतदारसंघात सगळं अनुकूल असताना रोहिणी खडसे यांचा पराभव झाला. रोहिणी खडसेंविरोधातील बंडखोरीबाबत वारंवार बोलून काहीच कारवाई झाली नाही. तरीही मी पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे मला पक्षाकडून न्याय मिळण्याची आशा आहे, अशी अपेक्षा एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली.



शिवसेना-भाजपमध्ये मुख्यमंत्री पदावरुन सध्या सुरु असलेल्या रस्सीखेचवर बोलताना खडसे यांनी म्हटलं की, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील. कारण अगोदरच पक्षाध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान यांनी तशी घोषणा केली आहे. अगोदरच तसं ठरलं असेल तर तेच होईल. त्यामुळे नितीन गडकरी मुख्यमंत्री होण्याचा प्रश्नच नाही, असं खडसेंनी म्हटलं.


आपल्या राजकीय जीवनात असे अनेक किस्से आहेत की ज्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर झाला आहे. यामध्ये सुरेश जैन हे आपले कट्टर विरोधक असताना देखील आपण त्यांना मुख्यमंत्री बनवावं यासाठी मुंबई येथे घेऊन गेलो होतो. हे गडकरी यांच्याशिवाय कोणाला आज माहित नाही. असे अनेक किस्से आहेत. त्याचं पुस्तक तयार होऊ शकेल, असं खडसे यांनी म्हटलं. त्यामुळे खडसेंचं आत्मचरित्र कधी तयार होणार आणि त्यात लोकांना कोणते किस्से वाचायला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे.