नवी दिल्ली : भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झाला सेवाकर विभागाने नोटीस धाडली आहे. सेवाकर चुकवल्याप्रकरणी सानियाला 16 फेब्रुवारीला हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.


सर्व्हिस टॅक्स विभागाच्या मुख्य आयुक्तांनी सानियाला 6 फेब्रुवारीला नोटीस बजावली आहे. सानियाला स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीने 16 फेब्रुवारीला आयुक्तांपुढे हजेरी लावायची आहे.

'सेवा कर न भरल्यामुळे/ कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे वित्त कायदा अंतर्गत 1994 तुमची चौकशी केली जाणार आहे. या तपासाशी निगडीत कागदपत्रं तुमच्याकडे असतील असा विश्वास आहे.' असं नोटीशीत म्हटलं आहे.

जर तुम्ही जाणूनबुजून हजेरी लावली नाही, किंवा पुरावे तसंच आवश्यक कागदपत्रं सादर न केल्याची कायदेशीर कारणं देऊ शकला नाहीत, तर तुम्हाला शिक्षेची तरतूद आहे, असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे.