मुंबई : भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा आज 46 वा वाढदिवस आहे. यानिमित्त अनेक दिग्गजांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. हटके ट्वीट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या वीरेंद्र सेहवागनेही एक मजेशीर ट्वीट करत गांगुली यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

या ट्वीटमध्ये सेहवागने चार फोटो शेअर करत त्यांना विनोदी कॅप्शन्स दिलं. डावखुऱ्या सौरव गांगुली यांनी दोन पाऊलं पुढे सरसावत ठोकलेले गगनचुंबी षटकार आजही क्रिकेट चाहत्यांच्या काळजात घर करुन आहेत. सेहवागनेही असाच षटकार खेचत असणाऱ्या गांगुलींचा एक फोटो शेअर केला आहे. ‘जागे व्हा, आपले डोळे दोनदा मिचकवा आणि खेळपट्टीवर डान्स करा,’असं कॅप्शन सेहवागने या फोटोला दिलं आहे.

गांगुली प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांची धुलाई करत जोरदार फटकेबाजी करत असे. अनेकदा त्यांनी ठोकलेल्या षटकारांनी प्रेक्षकही जखमी होत. गांगुलींच्या षटकाराने जखमी झालेल्या प्रेक्षकाचा फोटोही सेहवागने आपल्या ट्वीटमध्ये शेअर केला आहे.

सौरव गांगुली फलंदाजीबरोबरच आपल्या गोलंदाजीनेही समोरच्या संघाला अडचणीला आणत असे. सेहवागने गोलंदाजी करणाऱ्या गांगुलीचाही एक फोटो शेअर केला आहे. ‘फक्त चेंडू नाही तर केस देखील स्विंग करा,’ असं कॅप्शन सेहवागने या फोटोला दिलं आहे.

आक्रमक सौरव गांगुलींच्या नेतृत्वातच भारतीय संघ परदेशातही प्रतिस्पर्धी संघावर वरचढ होऊ लागला. इंग्लंडच्या ऐतिहासिक ‘लॉर्ड्स’ मैदानात 2002 साली नेटवेस्ट सीरिज जिंकल्यानंतर गांगुलींनी आपला टी-शर्ट भिरकावत जल्लोष केला होता. हा फोटोही सेहवागने शेअर केला आहे.


सेहवागने आपल्या ट्वीटद्वारे सौरव गांगुली यांचं अष्टपैलू व्यक्तीमत्त्व उलगडण्याचाच प्रयत्न केला आहे, असंच म्हणावं लागेल.